एनडीएची कोंडी; राष्ट्रपती उमेदवारावर मतभेद

नवी दिल्लीत एनडीएची आज झालेली बैठकही निष्फळ ठरली. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी दोन तास एनडीएच्या नेत्यांची बैठक झाली. मात्र या बैठकीत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर झाला नाही. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर एनडीएत मतभेद असल्याचं स्पष्ट झालंय.

Updated: Jun 17, 2012, 03:47 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

नवी दिल्लीत एनडीएची आज झालेली बैठकही निष्फळ ठरली. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी दोन तास एनडीएच्या नेत्यांची बैठक झाली. मात्र या बैठकीत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर झाला नाही. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर एनडीएत मतभेद असल्याचं स्पष्ट झालंय.

 

लालकृष्ण अडवाणी एनडीएशासीत राज्यातल्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर होईल अशी माहिती शरद यादव यांनी दिलीय.

 

संगमांच्या उमेदवारीला सेनेचा विरोध 

एनडीएच्या बैठकीला शिवसेना गैरहजर राहिली. संगमांच्या उमेदवारीला शिवसेनेनं विरोध दर्शवलाय. कलमांशिवाय अन्य कुणालाही पाठिंबा नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय. तसंच ही निवडणूक लढवून पायावर धोंडा पाडून घेण्यात अर्थ नसल्याची प्रतिक्रिया शिवसेनेनं दिलीय. उमेदवारीबाबत दोन दिवसांनंतर शिवसेनाप्रमुख निर्णय जाहीर करतील अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिलीय. गेल्यावेळच्या राष्ट्रपती निवडणुकीतही सेनेनं उघडपणे प्रतिभा पाटील यांना उघडपणे पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे आताही शिवसेनेनं गैरहजर राहण्याची भूमिका घेतल्यानं NDAची कोंडी झालीय.

 

 पी.ए.संगमा उमेदवारीवर ठाम

एकीकडे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरून मित्रपक्षांनी एनडीएची कोंडी केलेली असतांना दुसरीकडे पी.ए.संगमा मात्र उमेदवारीच्या रेसमधून मागे हटायला तयार नाहीत. सर्वपक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती संगमा यांनी केलीय. ममता बॅनर्जींसोबतही आपली चर्चा झाल्याचं संगमांनी म्हंटलय. शरद पवारांनी उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली असली तरी आपण मागे हटणार नाहीत असंही संगमांनी स्पष्ट केलय.

 

राम जेठमलानी रिंगणात

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि भाजप नेते राम जेठमलानी हेही राष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपनं जर राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिला तर आपण स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरू, पण ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, अशी भूमिका जेठमलानी यांनी घेतलीये. परदेशी बँकांमधल्या काळा पैसा परत आणण्याबाबत मुखर्जी यांनी ठोस भूमिका घेतली नाही, त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ नये, असं जेठमलानी यांचं मत आहे.

 

बैठकीला  शिवसेनेची अनुपस्थिती

राष्ट्रपतीपदाबाबत एनडीएची बैठक सुरू झालीय. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी ही बैठक सुरू आहे. मात्र या बैठकीला एनडीएतील घटक पक्ष शिवसेना अनुपस्थित आहे.... काल रात्री भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत संगमांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती पुढे आली होती.... पण शिवसेनेनं संगमांना विरोध केल्यानं आता एनडीएच्या बैठकीत काय निर्णय होतो याची उत्सुकता आहे.

 

एकीकडे प्रणव मुखर्जींच्या नावावर सर्वसंमती होण्याची चिन्हं दिसत असताना, भाजप प्रणवदांना तूर्तास पाठिंबा देण्याच्या तयारीत नसल्याचं चित्र काल निर्माण झालं.... पण घटक पक्षांचा कल आजमावून निर्णय घेण्याचं भाजपनं ठरवल्यानं आज एनडीएच्या बैठकीत होणा-या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष आहे..... भाजपानं संगमा यांना दिलेले पाठिंब्याचे संकेत, जेडीयूचा मुखर्जींच्या बाजूनं असलेला कल आणि शिवसेनेचे गैरहजेरी...एकूणच यातून NDAत सारकाही आलबेल नसल्याचं चित्र सध्यातरी दिसतंय.