www.24taas.com, नवी दिल्ली
जगात ब्रिक्स देशांचे वाढते आर्थिक महत्व अधोरेखित करण्यासाठी तसंच संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सारख्या जागतिक संस्थांमध्ये आपल्या भूमिकेला वजन प्राप्त करून देण्याच्या मुद्दांवर ब्रिक्स परिषदेत चर्चा झाली. इराणचा अण्विक तिढा तसंच सिरियाचा पेच सोजवण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी चर्चेतूनच मार्ग काढला पाहिजे यावर ब्रिक्स देशांचे एकमत झालं. ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेत जगातली निम्मी लोकसंख्या वास्तव्य करते. जगातल्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पन्नापैकी वाढता हिस्सा हा ब्रिक्स देशांचा आहे.
स्थानिक चलनात आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासंदर्भात दोन करार या परिषदेत झाले. तसंच ब्रिक्स देशांमध्ये पायाभूत सूविधांच्या उभारणीसाठी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी संयुक्त विकास बँकेची स्थापना करण्यावर एकमत झालं. बॅकेच्या स्थापनेसाठी कृती गटाची बांधणी करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंग, चीनचे राष्ट्राध्य हू जिंताओ, रशियाचे दिमित्री मेदवेदेव, ब्राझिलचे दिलमा राऊझेफ आणि दक्षिण आफ्रिकेचे जॅकब झुमा यांना जागतिक मुद्दांवर ब्रिक्स देशांमध्ये अधिक सामंजस्य निर्माण व्हावं तसंच संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सारख्या जागतिक संस्थांमध्ये सुधारणा व्हाव्यात या विषयांवर भर देत ब्रिक्स परिषदेची सांगता झाली.