www.24taas.com , नवी दिल्ली
एअर इंडियाचे सुमारे ८०० वैमानिक अचानक संपावर गेल्याने याचा फटका विमानसेवेवर झाला आहे. अनेक विमानांची उड्डाने रद्द करण्यात आली आहेत. याचा त्रास प्रवाश्यांना होत आहे.
या संपामुळे मुंबई आणि कोलकत्यातील विमानांचे वेळापत्रक कोलमडले आहे. तर इंडियन एअरलाईन्स पायलट असोसिएशनच्या निर्णयामुळे एअर इंडियाच्या देशभरातील उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचा परिणाम दिल्ली येथे आताच दिसून आला. येथील १० उड्डाणे वैमानिकांअभावी रद्द करावी लागली आहेत. तर कोलकत्यातील सुमारे ४४ वैमानिकांनी आज आजारपणाची सुटी घेतल्याने उड्डाणांवर परिणाम झाला आहे.
मासिक पगार आणि भत्ते न दिल्याने वैमानिकांनी आज शनिवारपासून संपाचे हत्यार उपसले आहे. दिल्लीतील एअर इंडियाच्या अनेक वैमानिकांनी आज आजारी रजेची सुट्टी घेतल्याने सुरवातीला उड्डाणांची वेळ पुढे ढकलण्यात आली होती. मात्र त्यानंतर १० उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. मुंबईत अनेक उड्डाणांच्या वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र उड्डाणे रद्द झाल्याचे वृत्त नाही.