मनसेला नाही मत, सेनेला मोजावी लागणार किंमत!

नाशिकमध्ये मनसेला अपशकून करू पाहणा-या शिवसेनेला त्याची किंमत आता ठाण्यात चुकवावी लागतेय.... शिवसेनेच्या नाशिकमधील भूमिकेनं संतप्त झालेल्या मनसेनं ठाण्यातला ठाकरे पॅटर्न मोडीत काढून युतीऐवजी आघाडीला पाठिंबा दिलाय.

Updated: Mar 19, 2012, 07:42 PM IST

www.24taas.com, ठाणे  

नाशिकमध्ये मनसेला अपशकून करू पाहणा-या शिवसेनेला त्याची किंमत आता ठाण्यात चुकवावी लागतेय.... शिवसेनेच्या नाशिकमधील भूमिकेनं संतप्त झालेल्या मनसेनं ठाण्यातला ठाकरे पॅटर्न मोडीत काढून युतीऐवजी आघाडीला पाठिंबा दिलाय... त्यामुळे स्थायी समितीसह अन्य समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेची दमछाक होणार असून आज पहिल्याच महासभेत झालेल्या नाट्यमय घडामोडींत त्याची झलक पहायला मिळाली....

 

मनसेच्या पाठिंब्यानं ठाण्याचं महापौरपद

सहज मिळवणा-या शिवसेनेला स्थायी समितीपासून अन्य समित्या ताब्यात ठेवण्यासाठी आता अग्नीपरीक्षेला सामोरं जावं लागेल.... नाशिकमध्ये मनसेच्या सत्तेच्या वाटेत खोडा घालणा-या उद्धव ठाकरेंच्या खेळीला ठाण्यात जशास-तसं उत्तर देत मनसेनं राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिल्यानं शिवसेनेच्या आता नाकीनऊ यायला लागलेत.

 

महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपला पाठिंबा देणा-या मनसेच्या सात आणि एक अपक्षानं आता राष्ट्रवादीच्या आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानं आघाडीचं संध्याबळ 57 वरून 65 पर्यंत पोहचलंय....दुसरीकडे शिवसेना-भाजप युतीचं संख्याबळ 73 वरून 65 पर्यंत खाली आलंय.... सत्ताधारी आणि विरोधकांचं संख्याबळ समसमान असल्यानं स्थायी समितीवर दोन्ही बाजूंचे प्रत्येकी आठ सदस्य निवडून येणार आहेत.... त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदाची निवड रंगतदार ठरणार आहे.

 

या बदललेल्या परिस्थितीचं चित्र महापालिकेच्या पहिल्याच महासभेत पहायला मिळालं.... या सभेत स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करण्यात येणार होती, पण महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी कोकणभवनातून महापालिकेतील संख्याबळाबाबत पत्र आलं नसल्याचं सांगून महासभा तहकूब केली....

 

 

निवडणूक पुढे ढकलल्यानं संतप्त झालेल्या विरोधकांनी मग महापौरांच्या खुर्चीचा ताबा घेतला आणि प्रतिमहासभा भरवली.... राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोहर साळवी महापौरांच्या खुर्चीत बसले. त्यांनी राष्ट्रवादीचे हनुमंत जगदाळे यांची सभागृह नेतेपदी निवड केली.