www.24taas.com, नाशिक
गेल्या महिनाभरापासून कांद्याचे दर घसरत असल्यानं नाशिक जिल्ह्यातला शेतकरी धास्तावला आहे. सरासरी दर अडीचशे असला तरी किमान दर दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत खाली आला.
उत्पादनखर्च आणि वाहतूक खर्च आकाशाला भिडले असताना कांद्याचे दर मात्र, दोनशेच्या फेऱ्यात अडकलेत. महिनाभर आंदोलन करून निर्यातबंदी दूर झाली असली तरी निर्यातीची मिनिमम एक्स्पोर्ट प्राईस जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत अधिक आहे. दुसऱ्या बाजूला नवीन कांद्याची आवक स्थानिक बाजारपेठेबरोबर राज्याबाहेरील कांदाही बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. त्यामुळं दिवसेंदिवस दर घसरतायत.
बाजारपेठेतील कागदोपत्री सरासरी दर जास्त असले तरी लिलावात मात्र, व्यापारी पाडून दर देत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.