उद्धव यांचा राज ठाकरेंना टोला

“मी दुष्काळी भागाचा दौरा करतोय, मंत्र्यांच्या परदेश दौ-यासारख्या फालतू विषयाकडे लक्ष द्यायला वेळ नाही”, असा टोला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज यांना लगावलाय.

Updated: May 4, 2012, 07:17 PM IST

www.24taas.com, सांगली

 

सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या दुष्काळग्रस्तांच्या आक्रोशानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर आसूड ओढलाय. पतंगरावांसारखे मंत्री महाराष्ट्राचं दुर्देव असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलयं. पतंगरावांनी जतमधील  42 गावांवर केलेला स्टंटबाजीचा आरोप दुर्देवी असल्याचंही उद्धव यांनी सांगितलंय. मंत्रालयातल्या बैलांना दांडक्यांनी कसं मारावं हे आपल्याला माहित असल्याचं उद्धव उद्विग्नपणे म्हणाले. महाराष्ट्रात येवून माझ्याबरोबर लढायला तयार रहा असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना दिलंय.

 

याच बरोबर “मी दुष्काळी भागाचा दौरा करतोय, मंत्र्यांच्या परदेश दौ-यासारख्या फालतू विषयाकडे लक्ष द्यायला वेळ नाही”, असा टोला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज यांना लगावलाय.

 

इतर नेत्यांवरील विश्वास उडाला तरी शिवसेनेवर विश्वास ठेवा असं आवाहनही त्यांनी जतमधील दुष्काळग्रस्तांना केलंय. दौ-यावर असलेल्या शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंसमोर दुष्काळग्रस्त शेतक-यांनी आक्रोश केला. दुष्काळ ग्रस्तांना कर्नाटकात सुविधा मिळतात मग महाराष्ट्रात का मिळत नाहीत असा सवाल सरकारला केलाय. गेल्या 7 वर्षांपासून सरकारचं आमच्याकडं लक्षच नसल्याचा आरोपही दुष्काळग्रस्तांनी केलाय. आता उद्धव ठाकरेंनीच दुष्काळग्रस्तांकडं लक्ष द्यावं अशी मागणी त्यांच्यासमोर या 42 गावांच्या दुष्काळग्रस्तांनी केलीय.