www.24taas.com , शिर्डी
बँकेच्या कर्जाला कंटाळून एका जोडप्यानं गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार शिर्डीतल्या हॉटेल साई धनप्रतापमध्ये उघड झालाय.
राजेंद्र आणि अर्जना निम्बेकर असं या दाम्पत्याचं नाव आहे. पुण्यातल्या बालाजीनगर भागात ते राहत होते. ५ जानेवारीला या दाम्पत्यनं या हॉटेलमध्ये आपली खरी ओळख लपवत अशोक जाधव या नावानं रुम घेतली होती. काल रात्री आठच्या सुमारास हॉटेल कर्मचा-यांनी रुमचा दरवाजा ठोठावल्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं पोलिसांना सूचना देण्यात आली.
पोलिसांनी दरवाजा तोडून रुममध्ये प्रवेश केला असता निम्बेकर दाम्पत्यानं पंख्याला दोरी अडकवून फाशी घेत आत्महत्या केल्याचं उघड झालं. यावेळी पोलिसांना या रुममध्ये एक सुसाइड नोटही आढळली. यांत कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचं नमूद करण्यात आलं होतं. या सुसाइड नोटसोबत काही कागदपत्रं आणि भारती सहकारी बँकेचं पासबुकही पोलिसांनी जप्त केलंय.
हे जोडपं व्यवसाय करत होते आणि त्यांना एक मुलगा असल्याचं या पासबुकवरुन उघड झालंय. गेल्या काही महिन्यांमध्ये शिर्डीत येऊन आत्महत्या करणा-यांच्या संख्येत वाढ झाली. यामागं कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता रुम भाड्यानं देत असल्याचं कारण असल्याचं सांगण्यात येतंय.