www.24taas.com, राहुरी
वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हेलिकॉप्टरनं राहुरीत केलेलं इमर्जन्सी लँडिंग वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. नागरी उड्डाण महासंचालनालयानं या इमर्जन्सी लँडिंगवर आक्षेप घेतला असून, घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीमध्ये वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हेलिकॉप्टरनं केलेलं इमर्जन्सी लँडिंग, आता पतंगरावांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. राहुरीमध्ये असलेल्या सभेसाठीच पतंगरावांचं हेलिकॉप्टर जाणूनबुजून उतरवण्यात आल्याचा आरोप होतो आहे. या इमर्जन्सी लँडिंग प्रकरणाची नागरी उड्डाण महासंचालनालयानं गंभीर दखल घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. तर राहुरीच्या तहसीलदारांनी मात्र परवानगी घेतल्याचं सांगून, पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
राजकीय नेत्यांच्या हेलिकॉप्टर वापराविषयी काही गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार हेलिकॉप्टरच्या टेक ऑफ आणि लँडिंगची माहिती २४ तास आधी एटीसी, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना द्यावी लागते. याशिवाय इतरही बऱ्याच अटींची पूर्तता केल्यानंतरच इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मिळते. मात्र, हे सर्व नियम धाब्यावर बसवून पतंगरावांचं हेलिकॉप्टर, इमर्जन्सी लँडिंगच्या नावाखाली राहुरीत उतरवण्यात आलं. आता या प्रकरणात पतंगरावांवर खरंच कारवाई होते की चौकशीची औपचारीकता पूर्ण केली जाते, हेच पहायचं आहे.