www.24taas.com, मुंबई
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहा जागांसाठी आज मतदान होतयं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीये. आघाडीतील दोन्ही पक्ष प्रत्येकी तीन तीन जागा लढवत आहेत. निवडणुकीत दोन्ही पक्षांना ऐकमेकांकडून दगाफटका होण्याची शक्यता वर्तवण्यात येतंय. नाशिक आणि अमरावतीच्या जागांबाबत तशी भीती व्यक्त करण्यात येतेय. तर चंद्रपूर गडचिरोलीत भाजपच्या सधन उमेदवारांचं आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे.
नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या जयंत जाधव यांच्या विरोधात शिवसेनेनं शिवाजी सहाणे यांना उमेदवारी दिली आहे. तर जयंत जाधव यांच्याविरोधात काँग्रेसच्या सुरेंद्र चव्हाण यांनी बंडखोरी केली आहे. अमरावतीत काँग्रेसच्या बबलू देशमुख या अधिकृत उमेदवाराविरोधात काँग्रेसच्याच पदाधिका-यानं बंड केलंय.
लातुर-बीड-उस्मानाबाद मतदारसंघातून कॉग्रेसचे उमेदवार दिलीप देशमुख निवडणुक रिंगणात आहे. मात्र सोलापुरला पाणी देण्याच्या प्रश्नावर उस्मानाबादमधल्या तीन तालुक्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घातल्याने कॉग्रेसमध्ये चिंतेच वातावरण आहे. त्यांच्याविरोधात भाजप पुरस्कृत उमेदवार सुधार धुत्तेकर रिंगणात आहेत. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अनिल तटकरे यांच्याविरोधात राजेंद्र पाटील आणि सोमेश शेट्टे रिंगणात उतरलेत. परभणी हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी रिंगणात आहेत. त्यांना अपक्ष उमेदवार ब्रीजलाल खुराणा यांनी आव्हान दिलंय. या निवडणुकीत प्रत्येक पक्षानं तुल्यबळ उमेदवार दिल्यानं निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.