झी २४ तास वेब टीम, मुंबई
गर्भलिंग निदान चाचणी आणि त्यानंतर होणारे गर्भपात ही अत्यंत क्लेशकारक घटना आहे. यामुळेच आता गर्भलिंग निदान चाचणीसाठी हायकोर्टाने काही प्रमाणात पायबंद घालण्यास सुरवात केली आहे.गर्भलिंग निदान चाचण्या रोखण्याच्या प्रयत्नांना बळ देणारा आणखी एक निर्णय मुंबई हायकोर्टानं दिला. पोर्टबल सोनोग्राफी मशिन ज्या संस्थेच्या अथवा हॉस्पिटलच्या नावे असेल त्यांनाच ते वापरता येईल आणि ते अन्यत्र नेता येणार नसल्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.
गर्भलिंग निदान करण्यासाठी फिरती सेवा देण्याऱ्या रेडिऑलॉजिस्टना यामुळं चाप बसणार आहे. मुंबई महापिलिकेच्या एक वॉर्डनं परिपत्रक काढून पोर्टेबल सोनोग्राफी मशिनच्या वापरावर निर्बंध आणले होते. त्याला रोडिओलॉजिस्ट आणि इमेजिंग असोसिएशन या संघटनेनं हायकोर्टात याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. अंथरुणाला खिळून असलेल्या पेशंटसाठी ही सेवा अत्यावश्यक असल्याचा त्यांचा दावा होता. मात्र कोर्टानं ही याचिका फेटाळून लावली. त्याचबरोबर सोनोग्राफीसंबंधी केंद्रांच्या मार्गदर्शक तत्वांनाही प्रसिद्धी देण्याचा आदेश कोर्टानं दिला. पालिकेचं हे परिपत्रक घटनात्मक स्वातंत्र्यावर निर्बंध आणत असल्याचा दावा संघटनेनं केला होता. मात्र कोर्टानं तो फेटाळून लावला.