कांद्याला भाव न मिळाल्याने सटाण्यात शेतकरी संतप्त

शेतकऱ्यांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी

Updated: Dec 12, 2018, 04:12 PM IST
कांद्याला भाव न मिळाल्याने सटाण्यात शेतकरी संतप्त title=

नाशिक - उन्हाळी कांद्यापाठोपाठ आता लाल कांद्यालाही कमी भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा राग अनावर झाला. त्यातच सटाणा बाजार समितीत लाल कांद्याला दीड रुपये किलो इतका कमी भाव मिळाल्यामुळे एक शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेला कांदा रस्त्यावर फेकून दिला. त्यातच इतर संतप्त शेतकऱ्यांनी परिसरात काहीवेळ रास्तारोको आंदोलन केले.

लाल कांद्याला मंगळवारी साडेचार रुपये किलो भाव मिळाला होता. बुधवारी त्यामध्ये आणखी घसरण झाली आणि दीड रुपये किलो इतकाच भाव मिळाला. त्यामुळे भाऊराव बिरारी या शेतकऱ्याने बाजारात विक्रीसाठी आणलेला कांदा रस्त्यावर फेकून दिला. बिरारी यांच्या या कृतीनंतर इतरही शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी सरकारच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी झाली. विंचूर मार्गावर यावेळी काहीवेळ रास्तारोको आंदोलनही करण्यात आले. आधीच उन्हाळी कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यात लाल कांद्यालाही भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.