पुणे: राज्यातील प्रत्येक जाती-जमातीकडून सध्या आरक्षणाची मागणी होत आहे. केवळ ब्राह्मण समाजाला आरक्षण नकोसे आहे. कारण, आम्ही स्वत:च्या क्षमतेवर पोट भरू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केले. ते बुधवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी आरक्षण, सावरकर वाद, सेन्सॉरशिप आणि नरेंद्र मोदी यांना शिवाजी महाराजांची देण्यात आलेली उपमा अशा मुद्द्यांवर भाष्य केले.
यावेळी गोखले यांनी म्हटले की, मी सावरकर भक्त आहे. ज्यांना सावरकर कधी कळलेच नाहीत, त्यांना ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर हा वाद पेटवत ठेवायचा आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काय माहिती आहे, असा सवालही यावेळी गोखले यांनी उपस्थित केला. तसेच ब्राह्मण समाजाला आरक्षण नको असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते- शरद पवार
गेल्या काही दिवसांपासून 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादासंदर्भातही त्यांनी भाष्य केले. छत्रपतींचे वंशज असलेल्या उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना देण्यात आलेल्या जाणता राजा या उपाधीवर आक्षेप घेतला होता. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जाणता राजा म्हणून तुलना करण्यालाही आपला विरोध आहे, असे उदयनराजे यांनी म्हटले होते. परंतु, शरद पवार हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. ते स्वत:ला कधी जाणता राजा म्हणवून घेणार नाहीत, असे विक्रम गोखले यांनी सांगितले. शिवाजी महाराजांची नरेंद्र मोदी यांच्यासोबत तुलना करणे अयोग्य आहे. मी मोदीभक्त नाही. तरीही मी या मताचा असल्याचे विक्रम गोखले यांनी सांगितले.