माझ्यात अवघड प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमत आहे, मोदींमध्ये नाही- राहुल गांधी

आपल्याकडे शिक्षण व्यवस्थेपासूनच सर्व स्तरांवर प्रश्न विचारण्याची मुभा नाही.

Updated: Apr 5, 2019, 01:39 PM IST
माझ्यात अवघड प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमत आहे, मोदींमध्ये नाही- राहुल गांधी title=

पुणे: एखाद्याने मला अवघड किंवा नावडता प्रश्न विचारला तरी त्याला सामोरे जाण्याची हिंमत माझ्यात आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा प्रश्नांना सामोरे का जात नाहीत, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारला. राहुल यांनी शुक्रवारी पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल यांनी म्हटले की, आपल्याकडे शिक्षण व्यवस्थेपासूनच सर्व स्तरांवर प्रश्न विचारण्याची मुभा नाही. शिक्षकांनी सांगायचे आणि विद्यार्थ्यांनी ऐकायचे असेच चालत आले आहे. मात्र, ही परिस्थिती बदलली पाहिजे. तुम्ही मला एखादा नावडता किंवा बुचकाळ्यात टाकणारा प्रश्न विचारला, तरी त्याला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. हा तुमच्या स्वभावाचा भाग असतो. भले मला एखाद्या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही. मात्र, मी नंतर ते शोधण्याचा प्रयत्न करेन, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

यावेळी राहुल यांनी नीती आयोग बरखास्त करण्यासंदर्भातही आपली भूमिका मांडली. यूपीएच्या काळातील नियोजन आयोग आणि नीती आयोगामध्ये एक मुलभूत फरक आहे. नियोजन आयोगाकडून राष्ट्रीय स्तरावर धोरण आखणी केली जायची. तर नीती आयोगाचा उद्देश हा केवळ तात्पुरता तोडगा (टॅक्टिस) काढण्यावर असतो. त्यामुळे नीती आयोगासारख्या संस्था राज्य स्तरावरच्या नियोजनासाठीच उपयुक्त असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. 

पुण्यातील विद्यार्थ्यांशी राहुल यांचा संवाद चांगलाच रंगला. अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या दोघांनीही राहुल यांना अनेक मजेशीर प्रश्नही विचारले. राहुल यांनीही मोठ्या हुशारीने या प्रश्नांना उत्तर दिली.