पुणे: पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करा, असा सल्ला मीच सरकारला दिल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. ते रविवारी राष्ट्रवादीचे शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ चाकण येथे झालेल्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, पुलवामा हल्ल्यानंतर तातडीने गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक घेण्यात आली. त्यावेळी माजी संरक्षणमंत्री या नात्याने मला सल्ला विचारण्यात आला. तेव्हा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी भारतीय लष्कराला आदेश द्यावेत आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करावेत, असे मी सुचवल्याचे शरद पवार यांनी म्हटले. यावेळी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टोला लगावला. दिल्लीत आमची बैठक सुरु असताना मोदी यवतमाळमध्ये भाषण ठोकत होते. मै चौकीदार हू, देश की सुरक्षा मेरे हात मे हैं. देश को कुछ होने नही दुंगा. काश्मीरमध्ये जाऊन हे बोलायचं सोडून ही ५६ इंचाची छाती यवतमाळमध्ये हे बोलत होती, असे पवारांनी सांगितले. त्यामुळे आता भाजप या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील शनिवारी याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. पुलवामा हल्ल्यानंतरच मोदींकडून बराचकाळ कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. याविषयी अनेकांना आश्चर्यही वाटले होते. मात्र, पुलवामा हल्ला झाल्यानंतर मोदी हे उत्तराखंडच्या जीम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्यात शुटिंगमध्ये व्यग्र होते, असे राहुल यांनी सांगितले.
माझ्या उमेदवारीने अनेकांना धडकी- अमोल कोल्हे
यावेळी त्यांनी शेतीच्या धोरणांवरूनही केंद्र सरकारला लक्ष्य केले. देशातील शेतकरी सध्या अडचणीत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला चांगली किंमत दिली तर तो कर्जमाफी मागणार नाही. ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांविषयी आस्था नाही. मला शक्य आहे तोपर्यंत मी शेतमालाला योग्य किंमत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, असेही पवारांनी सांगितले.