मुंबई: हिंदू धर्मात ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. या वर्षात दोन चंद्रग्रहण आणि दोन सूर्यग्रहण आहेत. त्यापैकी एक चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण झालं आहे. त्यामुळे या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर 2022 रोजी असणार आहे. खगोलशास्त्रानुसार सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यानंतर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि सूर्यग्रहण लागते.
25 ऑक्टोबरला सूर्यग्रहण संध्याकाळी 4 वाजून 29 मिनिटांनी सुरु होईल आणि 5 वाजून 42 मिनिटांपर्यंत असेल. मात्र हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, त्यामुळे सूतक काळही मान्य नसेल. ग्रहण आफ्रिका, यूरोपातून दिसणार आहे. तसंच आशियातील दक्षिणी भागातूनही ग्रहण दिसणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाचा प्रभाव 12 राशींवर जाणवेल.
ग्रहण काळात 'या' बाबी लक्षात ठेवा
हिंदू धर्मानुसार ग्रहण काळात ठेवलेले अन्न दूषित मानले जाते. त्यामुळे या काळात काहीही खाणे टाळावे. तसेच ग्रहण काळावधीत कापलेल्या भाज्या किंवा शिजवलेले अन्न फेकून द्यावे. ठेवलेले अन्न खाल्ल्याने अनेक प्रकारचे आजार होतात.ज्योतिष शास्त्रानुसार या काळात गर्भवती महिलांनीही विशेष काळजी घ्यावी. ग्रहणाचा परिणाम मुलावरही होतो. त्यामुळे ग्रहण काळात घराबाहेर पडू नका. ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा प्रसारित होते. त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. ग्रहण काळात भगवान शिवाच्या महामृत्यूंजय मंत्राचा जप करावा. सूर्यग्रहण संपल्यानंतर स्नान करून अन्नदान करावे.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक माहिती आहे बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )