मकर संक्रांत का साजरी केली जाते? जाणून घ्या त्या मागचे शास्त्रशुद्ध कारण

Makar Sankranti 2024 : नवीन वर्षात उत्साहाच वातावरण घेऊन आलेला मकर संक्रात हा पहिला सण असतो. अगदी कडाक्याची थंडी आणि नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरा दिवसात येणारा हा सण उत्साहाने भरलेला असतो. या सणात खाण्यासोबतच पतंग उडवण्याचा देखील आनंद असतो. पण मकर संक्रात का साजरी केली जाते, तुम्हाला माहित आहे का?

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 15, 2024, 12:01 PM IST
मकर संक्रांत का साजरी केली जाते? जाणून घ्या त्या मागचे शास्त्रशुद्ध कारण  title=

मकर संक्रांत हा सण संपूर्ण भारतात उत्साहाने साजरा केला जातो. या सणाचं नाव देखील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळं आहे. भारतात हा सण अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात मात्र हा सण मकर संक्रांती याच नावाने ओळखला जातो. मात्र, तुम्हाला मकर संक्रांती हा सण नेमका का आणि कशासाठी साजरा केला जातो, हे माहितीय का? या सणाचं काय विशेष महत्त्व आहे. 

शास्त्रानुसार 

शास्त्रानुसार असे म्हटले जाते की, सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा ज्योतिषात त्याला 'संक्रांत' असं म्हंटलं जातं. याच मकर संक्रांतीच्या मुहूर्ताला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो, या निमित्तानेच हा सण साजरा केला जातो. भारतात हा सण दरवर्षी 14 जानेवारीच्या सुमारास साजरा केला जातो. याचं सणामागे काही पौराणिक महत्त्व देखील आहे.यंदा मकर संक्रांत 15 तारखेला साजरी केली जात आहे. 

हे पण वाचा - Makar Sankranti Wishes : मकर संक्रांतीला तिळगुळासोबतच द्या गोड शुभेच्छा) 

पौराणिक कथा 

पौराणिक कथेनुसार, 'संक्रांती' या नावाची एक देवी होती. या देवीनेच शंकरासूर नावाच्या एका दुष्टाचा खात्मा केला होता. म्हणूनच हा दिवस 'मकर संक्रांती' म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या नंतरचा दिवस हा 'करीदिन' किंवा 'किंक्रांत' या नावाने ओळखला जातो. कारण, या दिवशी देवीने दैत्य किंकरासुराचा वध केला होता. 

उघडते स्वर्गाचे दार 

 धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते. म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते. यामागे कारणही तसंच आहे. कथेनुसार, संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते. त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो. यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते.

दान करण्याची प्रथा 

मकर संक्रांतीच्या दिवशी शुध्द तूप आणि शाल याचे दान केल्यास मोक्षप्राप्ती होते. महाभारत काळात भीष्म पितामह यांनी देहत्याग करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता. गीतेत सांगितले आहे की, जो माणूस उत्तरायणात शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतात म्हणून हा दिवस लोकं आनंद- उत्साहात साजरा करतात.

पुराणातील कथा 

श्रीमद्भगवत तसेच देवी पुराणानुसार शनी महाराजाचे त्यांच्याच वडिलांशी वैर होते. कारण सूर्य देवाने त्याची आई छायाला त्याच्या दुसऱ्या बायकोचा संज्ञाचा मुलगा यमराजाशी भेदभाव करताना पहिले होते. या गोष्टीने नाराज होऊन सूर्य देवाने संज्ञा आणि त्यांचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते. म्हणून शनी व छाया यांनी सूर्य देवाला कुष्ठरोग्याचा शाप दिला होता.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)