Diwali 2024 Date : दसऱ्यानंतर वेध लागतात ते दिवाळी सणाचे...दिवाळी या नावातच उत्साह आणि आनंद जाणवतो. दारात रांगोळी, नवीन कपडे, कंदील, फटाके, फराळ आणि पणत्यांची आरास...प्रकाशाचा उत्साह हा लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. संपूर्ण कुटुंब एकत्र दिवाळीत सणाचा आनंद साजरा करतात. हिंदू धर्मात या सणाला अतिशय महत्त्व असून सर्वात मोठा सण असतो.
कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला दिवाळीचा सण साजरा करण्यात येतो. यंदा दिवाळी 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर नक्की कधी आहे याबद्दल सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. काही लोक दिवाळी तिथीवरुन गोंधळ निर्माण झालाय. अशात छोटी दिवाळी, लक्ष्मीपूजन तिथीसह यंदा दिवाळी किती दिवसांची आहे याबद्दल आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी सांगितलंय.
दिवाळीच्या पहिला दिवस म्हणजे वसुबारस...या दिवशी गाई वासराची पूजा करण्याची परंपरा आहे. याला गोवत्स द्वादशी असंही म्हटलं जातं. यंदा वसुबारस या सणाला रमा एकादशीचा शुभ संयोग जुळून आला. वसुबारसला त्यांना गोडाधोडाचं नैवेद्य अर्पण करण्यात येतं. पंचांगानुसार वसुबारसचा सण 28 ऑक्टोबरला असणार आहे.
दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी जी पंचांगानुसार त्रयोदशी तिथीला साजरी करण्यात येते. धनत्रयोदशीला धन्वंतरी जंयती असंही म्हणतात. धनत्रयोदशीला भौमप्रदोष व्रत आणि यमदीपदान असणार आहे. यादिवशी कुबेर देव, धन्वंतरी देव, माता लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करण्यात येते. हा दिवश खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो. साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असा हा दिवस लोक यादिवशी सोने चांदीसह गाडी घर, मालमत्ता आणि भांड्यांची खरेदी करतात.
पंचांगानुसार त्रयोदशी तिथी 29 ऑक्टोबरला सकाळी 10.31 मिनिटांपासून 30 ऑक्टोबर दुपारी 1.15 मिनिटांपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार धनत्रयोदशी मंगळवारी 29 ऑक्टोबरला असणार आहे.
29 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:31 पासून रात्री 8:31 पर्यंत असणार आहे. धनत्रयोदशीच्या पूजेसाठी तुम्हाला 1 तास 42 मिनिटं वेळ मिळणार आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग तो खरेदीसाठी शुभ मानला जातो. हा योग 29 ऑक्टोबरला सकाळी 6.31 ते दुसऱ्या दिवशी 30 ऑक्टोबरला सकाळी 10.31 पर्यंत असणार आहे. या योगात खरेदी केल्यावर गोष्टी तिप्पट वाढतात.
पंचांगानुसार, या वर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 30 ऑक्टोबरला दुपारी 1:15 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:52 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार नरक चतुर्दशी किंवा दिवाळीची पहिली आंघोळ 31 ऑक्टोबर गुरुवार असणार आहे. यादिवशी पहाटे उठून उटणं तेल लावून अभ्यंगस्नान केलं जातं. त्यानंतर नवीन कपडे घालून फराळाचं सेवन केलं जातं.
यंदा लक्ष्मीपूजन तिथीवरुन सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. अमावस्ये तिथीला लक्ष्मीपूजन करण्यात येतं. अमावस्या 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजून 12 मिनिटापासून 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजून 53 मिनिटापर्यंत असणार आहे. उदया तिथी आणि प्रदोष काळानुसार 1 नोव्हेंबरला दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजन असणार आहे.
त्यासोबत प्रदोष काळ आणि वृषभ काळ हे दोन शुभ काळ दिवाळीत पूजेसाठी महत्वाचे आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार प्रदोष आणि वृषभ काळात दिवाळी पूजा किंवा लक्ष्मी पूजा करणे खूप शुभ मानले जाते. प्रदोष काळ संध्याकाळी 5 वाजून 36 मिनिटे ते 8 वाजून 11 मिनिटापर्यंत राहील. वृषभ काळ संध्याकाळी 6 वाजून 20 मिनिटे ते 8 वाजून 15 मिनिटापर्यंत राहील. या काळातच लक्ष्मीची पूजा करता येते.
लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त - लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:36 ते 6:15 पर्यंत
सहसा लक्ष्मीपूजना झालं की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा साजरा करण्यात येतो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस अतिशय शुभ असतो. यादिवशी पत्नी पतीला ओवाळून त्याच्या दीर्घयुष्याची कामना करते. हा सण 2 नोव्हेंबरला शनिवारी साजरा करण्यात येणार आहे. व्यापारी यादिवशी नवीन वर्षांची सुरुवात करतात. यादिवशी चोपडी पूजा करण्यात येते.
दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त - सकाळी 6.14 ते 8.35 मिनिटांपर्यंत
भाऊबीजचा सण हा बहीण-भावासाठी अतिशय जिव्हाळ्याचा असतो. हा सण बहीण आणि भावाच्या नात्याल समर्पित केलेला आहे. हा सण 3 नोव्हेंबरला बुधवारी साजरा करण्यात येणार आहे. भाऊबीजेचा हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला साजरा करण्यात येतो.
भाऊबीजेचा शुभ मुहूर्त - दुपारी 1 वाजून 19 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 22 मिनिटांपर्यंत
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)