Pitru Paksha 2022: हिंदू धर्मात पितृ पंधरवड्याला विशेष महत्त्व आहे. या वर्षी पितृ पक्ष (Pitru Paksha) 10 सप्टेंबर 2022 पासून सुरु होईल आणि 25 सप्टेंबर 2022 रोजी संपेल. हिंदू धर्मग्रंथानुसार पितृ पक्ष पितरांना पिंड दान करण्यासाठी समर्पित आहे. कुंडलीत पितृ दोष असेल तर त्याच्या निवारणासाठी पितृ पक्षात केलेले उपाय फार प्रभावी ठरतात. अशा परिस्थितीत पितृदोषाने त्रस्त असलेल्या लोकांसाठी ही एक चांगली संधी आहे. या काळात पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कावळ्यांना अन्न घातलं जातं. अन्नाला काकस्पर्श झाल्यानंतर पितरांना पोहोचलं असा समज आहे. पितृपक्षात घराच्या अंगणात कावळा आला की, शुभ मानलं जातं. पण पितरांचं प्रतीक कावळाच का असतो? असा प्रश्न अनेकांना पडतो.
कावळ्याला यमराजाचं दूत असल्याचं मानलं जातं. पौराणिक कथेनुसार, कावळा नैसर्गिकरित्या मरत नाही. त्याचा अपघाती मृत्यू होतो. तसेच कावळ्याचा मृत्यू झाला की, त्याचे साथीदार अन्न खात नाहीत, अशी मान्यता आहे. तसेच यमाने कावळ्याला वरदान दिलं आहे की, तुला दिलेलं अन्न पूर्वजांच्या आत्म्यांना शांती देईल. त्यामुळे पितृ पक्षात कावळ्यांना अन्न देण्याची प्रथा आहे. कोणताही आत्मा कावळ्याच्या शरीरात राहू शकतो. या काळात पूर्वज कावळ्याचे रूप धारण करतात अशी समज आहे. या भावनेतून कावळ्यांना अन्न देऊन पूर्वजांचे आशीर्वाद मिळवले जातात.
पितृ पक्षात घराच्या छतावर किंवा खिडकीत डोकावणारे कावळे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. या काळात नेहमी येणारे कावळे पितृपक्षात घराकडे फिरकत सुद्धा नाहीत, असा देखील अनुभव अनेकांना येतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)