लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी पराभव झाला. इंग्लंडच्या फास्ट बॉलिंगसमोर भारतीय बॅट्समननी लोटांगण घातलं. अंडरसननं २३ रन देऊन ४ विकेट तर ब्रॉडनं ४४ रन देऊन ४ विकेट घेतल्या. पहिल्या इनिंगमध्ये भारताचा १०७ रनवर तर दुसऱ्या इनिंगमध्ये १३० रनवर ऑल आऊट झाला. या मॅचमध्ये इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसननं लॉर्ड्सवर १०० विकेट घेण्याचा विक्रम केला. एका मैदानात १०० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणारा अंडरसन हा पहिला फास्ट बॉलर आणि दुसरा बॉलर ठरला आहे. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननं कोलंबो, गेल आणि कॅन्डी या तीन मैदानांमध्ये प्रत्येकी १०० विकेट घेतल्या.
एकीकडे जेम्स अंडरसननं हे रेकॉर्ड केलं असतानाच इंग्लंडचा दुसरा बॉलर आदिल रशीदनंही अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. आदिल रशीदनं या मॅचमध्ये एकही विकेट घेतली नाही, एकही रन केली नाही तसंच एकही कॅच पडकला नाही आणि एकही रन आऊट केला नाही. या मॅचमध्ये काहीही न करता आदिल रशीदला ११ लाख रुपये मिळाले.
संपूर्ण मॅचमध्ये काहीही योगदान न देणारा रशीद १४ वा खेळाडू ठरला आहे. १३ वर्षानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूनं हे रेकॉर्ड केलं आहे. याआधी २००५ साली गॅरेथ बेटीनं बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये हे रेकॉर्ड केलं होतं. ही मॅचही लॉर्ड्सवरच झाली होती. या मॅचमध्ये इंग्लंडनं बांगलादेशचा इनिंग आणि २६१ रननी पराभव केला होता.