close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अफगाणिस्तानची आणखी एक भरारी; ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी

अफगाणिस्तानची क्रिकेट टीम रोज नव्या विक्रमांना गवसणी घालत आहे. 

Updated: Sep 16, 2019, 08:52 AM IST
अफगाणिस्तानची आणखी एक भरारी; ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी

ढाका : अफगाणिस्तानची क्रिकेट टीम रोज नव्या विक्रमांना गवसणी घालत आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मॅचमध्येही अफगाणिस्तानने असाच एक विक्रम करत ऑस्ट्रेलियाशी बरोबरी केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या या मॅचमध्ये अफगाणिस्तानचा २५ रननी विजय झाला. अफगाणिस्तानचा हा टी-२० मधला लागोपाठ १२वा विजय आहे. ऑस्ट्रेलियाचंही लागोपाठ १२ टी-२० मॅच जिंकण्याचं रेकॉर्ड आहे.

या मॅचमध्ये अफगाणिस्तानने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करत १६४/६ एवढा स्कोअर केला. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा १९.५ ओव्हरमध्ये ऑल आऊट झाला. बांगलादेशकडून मेहमदुल्लाने सर्वाधिक ४४ रन केले, तर शब्बीर रहमानने २४ आणि अफीफ हुसैनने १६ रनची खेळी केली. अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमानने १५ रन देऊन सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर फरीद मलिक, राशिद खान आणि गुलबदीनने प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

त्याआधी अफगाणिस्तानची अवस्था ४० रनवर ४ विकेट अशी झाली होती. पण मोहम्मद नबीने ५४ बॉलमध्ये नाबाद ८४ रनची खेळी करुन अफगाणिस्तानला १६४ रनपर्यंत पोहोचवलं. नबीच्या या खेळीत ३ फोर आणि ७ सिक्सचा समावेश होता. अजगर अफगाणने ३७ बॉलमध्ये ३ फोर आणि २ सिक्सच्या मदतीने ४० रन केले. बांगलादेशकडून मोहम्मद सैफुद्दीनने ४ आणि शाकिब अल हसनने २ विकेट घेतल्या.

बांगलादेश, अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-२० ट्रँग्युलर सीरिज सुरु आहे. याआधी शनिवारी अफगाणिस्तानने झिम्बाब्वेचा २८ रननी पराभव केला होता. या मॅचमध्ये मोहम्मद नबी आणि नजीबुल्ल्हा झादरानने ७ बॉलमध्ये ७ सिक्स लगावले होते. १६ ओव्हरमध्ये अफगाणिस्तानचा स्कोअर १२३/४ एवढा होता. यानंतर नबी आणि झादरानने ७ बॉलमध्ये ४२ रन केले. त्यामुळे झिम्बाब्वेला विजयासाठी १९८ रनचं आव्हान मिळालं.

भारतालाही न जमलेला विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर

अफगाणिस्तानने २०१८ आणि २०१९मध्ये सगळ्या टी-२० मॅच जिंकल्या आहेत. मागच्या १२ मॅचमध्ये अफगाणिस्तानने झिम्बाब्वेला ३ वेळा, बांगलादेशला ४ वेळा, आयर्लंडला ५ वेळा हरवलं आहे. त्याआधी अफगाणिस्तानला वेस्ट इंडिजने २०१७ साली हरवलं होतं.