'निष्पक्ष स्पर्धा खेळवा, तुम्ही जर असल्या मैदानांवर...', पराभवानंतर अफगाणिस्तानचा प्रशिक्षक संतापला, 'सपाट मैदानं...'

टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तान (Afghanistan) संघाचा विजयरथ अखेर सेमी फायनलमध्ये थांबला आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) अफगाणिस्तानचा अत्यंत लाजिरवाणा पराभव केला.   

शिवराज यादव | Updated: Jun 27, 2024, 04:30 PM IST
'निष्पक्ष स्पर्धा खेळवा, तुम्ही जर असल्या मैदानांवर...', पराभवानंतर अफगाणिस्तानचा प्रशिक्षक संतापला, 'सपाट मैदानं...' title=

टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तान (Afghanistan) संघाचा विजयरथ अखेर थांबला आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) सेमी फायनलमध्ये अफगाणिस्तान संघाचा 9 विकेट्स राखून लाजिरवाणा पराभव केला. अफगाणिस्तान संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांना महागात पडला आणि संपूर्ण संघ 56 धावांवर बाद झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि वर्ल्डकपमधील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. पराभवानंतर अफगाणिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट (Jonathan Trott) यांनी आयसीसीवर (ICC) संताप व्यक्त केला असून ही स्पर्धाच नव्हती असं म्हटलं आहे. 

सामन्यानंतर जोनाथन ट्रॉट यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी आपल्याला कोणत्याही वादात अडकायचं नाही, मात्र वर्ल्डकप सेमीफायनलसाठी तयार करण्यात आलेल्या अत्यंत खराब खेळपट्टीवर मला लक्ष केंद्रीय करायचं आहे असं ते म्हणाले. 

"मला कोणत्याही वादात अडकायचं नाही, पण वर्ल्डकपची सेमी-फायनल तुम्ही अशा खेळपट्टीवर खेळवू शकत नाही. अत्यंत सपाट आणि साधं...ही स्पर्धा निष्पक्ष व्हायला हवी होती. मी असं म्हणत नाही की, स्पिन किंवा सीम होऊ नये. पण जेव्हा फलंदाज खेळण्यासाठी पुढे जाईल तेव्हा चेंडू डोक्यावर जाण्याची भीती वाटू नये. चेंडू आपल्या कौशल्याने खेळण्याची संधी मिळायला हवी. टी-20 म्हणजे आक्रमक खेळी, धावा करणं आणि विकेट्स घेणं आहे. फक्त आपला बचाव करणं नव्हे," असं जोनाथन ट्रॉट यांनी सांगितलं.

जोनाथन ट्रॉट यांनी खेळपट्टीने दोन्ही बाजूंना फायदा व्हावा असं वाटत होतं. पण ही खेळपट्टी प्रतिस्पर्धी संघासाठी जास्त अनुकूल ठरली असं त्यांना वाटलं. "जर विरोधी संघाने चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या कौशल्याच्या आधारे तुम्हाला त्या स्थितीत आणलं तर चे चांगलं आहे. मग ते स्थितीशी जुळवून घेण्याबद्दल आहे. जर आम्ही दक्षिण आफ्रिकेप्रमाणे गोलंदाजी केली असती, तर तुम्हाला दुसरा हाफ वेगळा दिसला असता," असं ते म्हणाले. 

जोनाथन ट्रॉट यांनी संघाच्या व्यग्र वेळापत्रकाकडेही लक्ष वेधलं. पण हे आमच्या पराभवाचं कारण आहे असं म्हणणार नसल्याचंही स्पष्ट केलं. "आम्ही तीन वाजता हॉटेलवर परतलो आणि पाच तासांनंतर आठ वाजता निघावे लागले. त्यामुळे आम्हाला जास्त झोप मिळाली नाही. त्यामुळे खेळाडू साहजिकच खूप थकले होते. त्यांना शारिरीक आणि भावनिकदृष्ट्या फार प्रक्रिया करायची होती. त्यांच्यासाठी हे सर्व नवीन होतं," असं त्यांनी सांगितलं. 

"परंतु आम्हाला वेळापत्रक माहित होते, त्यामुळे हे निमित्त नाही. जेव्हा तुम्ही विश्वचषक किंवा स्पर्धांमध्ये जाता तेव्हा तुमच्याकडे सर्वकाही स्वतःच्या इच्छेनुसार असू शकत नाही. तुम्हाला लढा द्यावा लागेल आणि तुमच्यासमोर असलेल्या अडचणींविरुद्ध खेळावे लागेल. आम्ही काही वेळा ते केलं असून त्याचा खूप अभिमान आहे. पण आज आम्ही जिंकू शकलो नाही हे कारण नाही. दक्षिण आफ्रिकेने चांगली गोलंदाजी केली, परिस्थितीचा वापर केला आणि आमच्या खेळाडूंना ते किती सक्षम आहेत हे दाखवून दिलं. पण आज रात्री ते आमच्या वाट्याला आले नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.