लंडन : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत बांग्लादेशने विक्रम रचत पहिला विजय मिळवला आहे. बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर २१ रन्सने विजय मिळवला. वन-डे क्रिकेटमध्ये बांग्लादेशने ३३० अशी विक्रमी धावसंख्येची नोंद केली आहे. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका ने ८ बाद ३०९ रन्स केल्या. विश्वचषक स्पर्धेत आपला पहिला सामना खेळणाऱ्या बांग्लादेशने आफ्रिकेविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी करत धावांचा डोंगर उभा केला. मात्र, हा धावांचा डोंगर दक्षिण आफ्रिकेला पार करता आला नाही.
दक्षिण आफ्रिकेने सावध सुरुवात केली. सलामीवीर क्विंटन डि कॉक आणि ॲडिन मर्करम यांनी ४९ रन्सची भागिदारी केली. रहीमने डी कॉकला धावबाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. पण, त्यानंतर मार्करम आणि कर्णधार फाफ ड्यु प्लिसिसने खेळपट्टीवर जम बसवत रन्सची गती वाढवण्यास सुरुवात केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसठी ५१ धावांची भागिदारी रचत २० षटकात आफ्रिकेचे शतक धावफलकावर लावले. ही जोडी बांग्लादेशची डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच शाकिबने ४५ रन्सवर खेळाणाऱ्या मार्करमचा त्रिफळा उडवला.
सेट झालेला मार्करम बाद झाल्यानंतर ड्यु प्लिलिसने मिलरच्या साथीने आफ्रिकेचा डाव सावरला. या दोघांनी आफ्रिकेला १५० च्या जवळ पोहोचवले. ड्यु प्लिसिस या सामन्यात कॅप्टन्स इनिंग खेळाणार असे वाटत होते. पण, मेहदी हसनने त्याला चकवले आणि तो ६२ रन्सवर बोल्ड झाला. कर्णधार बाद झाल्यानंतर मिलरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, ३८ रन्स झाल्या असताना मुस्तफीझुर त्याला बाद केले. मिलर बाद झाला त्यावेळी आफ्रिका २०४ पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर डसेननेही ४१ रन्सची खेळी केली पण, सेट झाल्यानंतर मोक्याच्या क्षणी विकेट काढली गेली. आफ्रिकेचा ३९ व्या षटकात २२८ धावांवर निम्मा संघ माघारी परतला होता. बांग्लादेशकडून मुस्तफिझुर रहमानने ३ सैफुद्दीनने २ तर हसन आणि शाकिबने प्रत्येकी १ विकेट घेतल्या.
सहाव्या क्रमांकावर आलेल्या जे. पी. ड्युमिनिनेही ३७ बॉलमध्ये ४५ रन्सची खेळी करत मैदानात राहण्याचा प्रयत्न केला. पण, मुस्तफिझुरने त्याचाही त्रिफळा उडवत दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला. त्यानंतर आलेल्या तळातील फलंदाजांनीही काही विशेष करता आले नाही. आफ्रिकेला ५० षटकात ८ फलंदाजांच्या मोबदल्यात ३०९ रन्स करता आल्या.
बांग्लादेशच्या अष्टपैलू शाकीब अल-हसन आणि मुश्फिकुर रेहमान यांनी जोरदार फटकेबाजी करत ३३० रन्स उभ्या केल्या. बांग्लादेशची वन-डे आणि विश्वचषक संघातली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी वन-डे क्रिकेटमध्ये २०१५ मध्ये बांग्लादेशने पाकिस्तानविरुद्ध ३२९ रन्सचा पल्ला गाठला होता.
त्याआधी बांग्लादेशकडून कर्णधार मुशफिकूर रहीम (७८) आणि ऑल राऊंडर शाकिब - अल - हसनने (७५) तिसऱ्या विकेटसाठी दमदार १४२ रन्सची भागिदारी केली. तर स्लॉग ओव्हरर्समध्ये मोहम्मदुल्लाने ३३ बॉलमध्ये ४६ रन्सची आक्रमक खेळी करत बांग्लादेशला ३३० पर्यंत पोहोचवले. आफ्रिकेकडून इम्रान ताहीर, फेहलुक्वायो आणि मॉरिसने प्रत्येकी २ बळी घेत बांग्लादेशला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडलेत.