हम्बनटोटा : भारत आणि श्रीलंकेमध्ये अंडर-१९ यूथ टेस्टची २ मॅचची सीरिज सुरु आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची टीममध्ये निवड झाल्यामुळे या सीरिजची जोरदार चर्चा होती. पण पहिल्या टेस्टनंतर आता दुसऱ्या टेस्टमध्येही अर्जुन तेंडुलकर अपयशी ठरला आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये अर्जुन तेंडुलकर १४ रन बनवून आऊट झाला. अर्जुननं १८ बॉलमध्ये २ फोरच्या मदतीनं १४ रन केले. पहिल्या मॅचमध्येही बॅटिंग करताना अर्जुनला कमाल दाखवता आलेली नव्हती. पहिल्या मॅचमध्ये अर्जुन शून्य रनवर आऊट झाला होता. पहिल्या मॅचमध्ये बॉलिंग करताना एक विकेट मिळाली होती.
दुसऱ्या मॅचमध्ये पवन शाहनं विक्रमी द्विशतक झळकावलं. शाहनं २८२ रन केले. अंडर-१९ क्रिकेटमधील भारतीय क्रिकेटपटूचा हा सर्वाधिक स्कोअर आहे. शाहनं तन्मय श्रीवास्तवचं २२० रनचं रेकॉर्ड मोडलं. श्रीवास्तवनं २००६ साली पाकिस्तानविरुद्ध पेशावरमध्ये ही खेळी केली होती. अंडर १९ क्रिकेटमधला पवन शाहचा हा दुसरा सर्वात मोठा स्कोअर आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्लिंटन पीकनं १९९५ साली ३०४ रनची खेळी केली होती.
शाहनं इनिंगच्या १०८ व्या ओव्हरमध्ये लागोपाठ ६ फोर मारले. यातली पहिली फोर मारून शाहनं द्विशतक पूर्ण केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याआधी संदीप पाटील यांनी ६ बॉलला ६ फोर मारले होते. इंग्लंडचे फास्ट बॉलर बॉब विलीस यांच्या बॉलिंगवर पाटील यांनी हे रेकॉर्ड केलं होतं. पण या ओव्हरमध्ये विलीस यांनी एक नो बॉलही टाकला होता.
या सीरिजमध्ये अर्जुन तेंडुलकरची चर्चा सुरु असली तरी खरा हिरो ठरला अकोल्याचा अथर्व तायडे. दुसऱ्या टेस्टमध्ये अथर्व तायडेनं १७७ रनची खेळी केली. ओपनर असलेल्या अथर्वनं १७२ बॉल खेळले. यामध्ये २० फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता. ८९ बॉलमध्ये अथर्वनं शतक पूर्ण केलं.
कोलंबोमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्येही अथर्वनं १६० बॉलमध्ये ११३ रन केले. याचबरोबर अंडर-१९ मध्ये लागोपाठ दोन शतकं करणारा अथर्व पाचवा खेळाडू ठरला आहे. याआधी विनायक मानेनं इंग्लंडविरुद्ध २००१ साली, पियुष चावलानं २००६-०७ साली, अभिनव मुकुंदनं श्रीलंकेविरुद्ध आणि विजय झोलनं २०१३ साली लागोपाठ दोन टेस्टमध्ये शतकं केली होती.
८९ बॉलमध्ये शतक करणारा अथर्व तायडे सर्वात जलद शतक करणाऱ्या युवा खेळाडूंमध्ये दुसरा ठरला आहे. मोईन अलीच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. लीड्समध्ये श्रीलंकेविरुद्ध मोईन अलीनं ५६ बॉलमध्ये शतक केलं होतं. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतानं शानदार प्रदर्शन करत श्रीलंकेला इनिंग आणि २१ रननी हरवलं.