भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा विश्वविक्रम होणार

टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंडमध्ये ५ टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे.

Updated: Jul 25, 2018, 11:36 PM IST
भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडचा विश्वविक्रम होणार

एजबॅस्टन : टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंडमध्ये ५ टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. या सीरिजमधली पहिली टेस्ट १ ऑगस्टपासून एजबॅस्टनमध्ये खेळवण्यात येणार आहे. या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडची टीम विश्वविक्रमाला गवसणी घालणार आहे. ही टेस्ट इंग्लंडची १ हजारावी टेस्ट मॅच असणार आहे. १ हजार रनचा टप्पा ओलांडणारी इंग्लंड ही पहिली टीम ठरणार आहे. इंग्लंडनं आत्तापर्यंत ९९९ टेस्ट मॅच खेळल्या आहेत. या यादीमध्ये इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियाचा नंबर लागतो. ऑस्ट्रेलियानं आत्तापर्यंत ८१२ टेस्ट मॅच खेळल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक विजय

इंग्लंडनं सर्वाधिक टेस्ट मॅच खेळल्या असल्या तरी ऑस्ट्रेलियानं सर्वाधिक विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियानं ३८३ मॅच जिंकल्या आहेत. तर इंग्लंडला ३५७ मॅच जिंकता आल्या आहेत. ९९९ टेस्टमध्ये इंग्लंडला २९७ मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला. तर ३४५ मॅच ड्रॉ झाल्या. सर्वाधिक टेस्ट मॅच खेळणाऱ्या देशांच्या यादीमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियानंतर वेस्ट इंडिज आणि भारताचा क्रमांक लागतो. वेस्ट इंडिजनं ५३५ तर भारतानं ५२२ टेस्ट मॅच खेळल्या आहेत.

आत्तापर्यंत झाल्या २३१३ टेस्ट

दक्षिण आफ्रिका (४२७), न्यूझीलंड (४२६), पाकिस्तान(४१५), श्रीलंका (२७४), बांगलादेश (१०८), झिम्बाब्वे (१०५) आणि आयसीसी विश्व ११(एक मॅच), आयर्लंड (एक मॅच) आणि अफगाणिस्तान (एक मॅच) या देशांनी टेस्ट मॅच खेळली.