'त्याची कामगिरी विसरु नका'; विराटचं कौतुक होत असताना गांगुलीची खंत

टीम इंडियाचा २०१९ सालाचा शेवट गोड झाला आहे. या वर्षासोबतच २०१०-२०१९ हे दशकही संपलं आहे.

Updated: Dec 25, 2019, 04:54 PM IST
'त्याची कामगिरी विसरु नका'; विराटचं कौतुक होत असताना गांगुलीची खंत title=

मुंबई : टीम इंडियाचा २०१९ सालाचा शेवट गोड झाला आहे. या वर्षासोबतच २०१०-२०१९ हे दशकही संपलं आहे. या दशकामध्ये टीम इंडियाने उल्लेखनीय कामगिरी केली. भारताने या दशकात सर्वाधिक वनडे मॅच जिंकल्या तर सर्वाधिक रन करण्याचा विक्रम विराटच्या नावावर झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि विस्डनच्या टीमने विराट कोहलीला त्यांच्या दशकाच्या टीममध्ये स्थान दिलं.

विराट कोहलीचं जागतिक क्रिकेटमध्ये कौतुक होत असतानाच सौरव गांगुलीने ट्विट करुन लक्ष वेधून घेतलं आहे.  या दशकामध्ये आर.अश्विनने सर्वाधिक विकेट मिळवल्या. कठोर परिश्रम, अनेकवेळा अशा कामगिरीकडे दुर्लक्ष केलं जातं, अशी खंत गांगुलीने त्याच्या ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.  

अश्विनने या दशकात सर्वाधिक ५६४ विकेट घेतल्या आहेत. या यादीमध्ये अश्विन हा एकमेव स्पिनर आहे. यानंतर इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसनने ४७२ विकेट, स्टुअर्ट ब्रॉडने ५२५ विकेट घेतल्या. न्यूझीलंडच्या टीम साऊदीने ४७२ आणि ट्रेन्ट बोल्टला ४५८ विकेट मिळाल्या.

अश्विनने २०१० साली त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली. बराच कालावधी अश्विन हा बॉलरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. बऱ्याच काळापासून अश्विनला भारताच्या वनडे आणि टी-२० टीमपासून लांब ठेवण्यात आलं आहे. टेस्ट टीममध्ये अश्विनचं स्थान पक्कं असलं तरी मागच्या दीड वर्षात अश्विनला दुखापतींचं ग्रहण लागलं आहे.

अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद ५०, १००, १५०, २००, २५०, ३०० आणि ३५० विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. अश्विनने ७० टेस्ट मॅचमध्ये ३६२ विकेट, १११ वनडेमध्ये १५० विकेट आणि ४६ टी-२०मध्ये ५२ विकेट घेतल्या. बॅटिंगमध्ये अश्विनने ४ टेस्ट शतकं आणि ११ टेस्ट अर्धशतकं केली आहेत.