पाकिस्तान भुईसपाट! भारताचा ९ गडी राखून दणदणीत विजय

या दोघांनीही पाकिस्तानची गोलंदाजी अक्षरश: फोडून काढली.

Updated: Sep 23, 2018, 11:59 PM IST
पाकिस्तान भुईसपाट! भारताचा ९ गडी राखून दणदणीत विजय title=

दुबई: रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर रविवारी भारताने आशिया चषकातील सामन्यात पाकिस्तानवर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे विजयासाठी २३८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांच्या धक्कातंत्राची टीम इंडियाला चिंता होती. मात्र, सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी सुरुवातीपासून  कुठलेही दडपण न घेता चौफेर फटकेबाजी केली. या दोघांनीही पाकिस्तानची गोलंदाजी अक्षरश: फोडून काढली. विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना शिखर धवन चोरटी धाव काढण्याच्या प्रयत्नात बाद झाला.

मात्र, हा अपवाद वगळता पाकिस्तानचे गोलंदाज शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्यासमोर हतबल ठरले. रोहित शर्मा आणि धवन या दोघांनीही शतकी खेळी केली. त्यांनी सलामीच्या जोडीसाठी २१० धावांची भागीदारी रचत नवा विक्रमही प्रस्थापित केला. शिखर धवनने १०० चेंडूत ११४ धावा केल्या. तर रोहित शर्माने चेंडूत ११९ नाबाद १११ धावा केल्या. धवन बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या अंबाती रायडूने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने संयमी फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. रायडूने १८ चेंडूत १२ धावा केल्या.

तत्पूर्वी शोएब मलिकच्या अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांमध्ये २३७ धावा करता आल्या. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मलिकने ९० चेंडूंत ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ७८ धावांची खेळी केली. त्यामुळेच पाकिस्तानला २०० धावांचा टप्पा ओलांडता आला.