Asian Games 2018 : भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, कांस्यपदकावर नाव कोरले

 भारताच्या पुरुष हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २-१ ने पराभव केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 1, 2018, 06:53 PM IST
Asian Games 2018 : भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, कांस्यपदकावर नाव कोरले title=

जकार्ता : इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पुरुष हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २-१ ने पराभव केला आणि कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

भारताचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगल्याने भारताच्या खात्यात पदक जमा होणार का, याची उत्सुकता होती. भारतीय संघाला उपांत्य सामन्यात मलेशियाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मात्र कांस्यपदकासाठीच्या सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २-१ अशी पराभवाची धूळ चारली. भारताकडून सामन्यात आकाशदीप आणि हरमनप्रीत सिंहने गोल केले. पाकिस्तानकडून  मोहम्मद आतिकने एकमेव गोल केला.

 मलेशियाविरुद्ध झालेल्या पराभवाची मरगळ झटकत भारतीय हॉकी संघ मैदानात उतरला. पहिल्याच सत्रापासून भारतीय खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे पाकचे खेळाडू बॅकफुटवर गेले. तसेच तिसऱ्या मिनिटाला ललित उपाध्यायने पाकिस्तानचा बचाव भेदत डी-एरियात प्रवेश केला. ललितने दिलेल्या पासवर आकाशदीप सिंहने गोल करुन भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या सत्रात पाकिस्तानच्या खेळाडूंनी चांगली आक्रमण करुन भारतावर दबाव वाढविला. मात्र भारताच्या बचावफळीने त्यांची डाळ शिजू दिली नाही. दुसऱ्या सत्रात पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधीही आली होती. मात्र गोलकिपर श्रीजेशने पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले. त्यामुळे मध्यांतरापर्यंत भारताकडे सामन्यात १-० अशी आघाडी होती. तिसऱ्या सत्रापर्यंत पाकिस्तानला ४ पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र एकाही संधीचं गोलमध्ये रुपांतर करण्यात पाकिस्तानचे खेळाडू अयशस्वी ठरले. 

तिसऱ्या सत्रात भारताने मात्र भक्कम बचाव करत आपली १-० ही आघाडी कायम राखली. मनजीत सिंह, चिंगलीन साना यांनी बचावात चांगली कामगिरी पार पाडली. चौथ्या सत्रात भारताला सामन्यातला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. याचा पुरेपूर फायदा घेत हरमनप्रीत सिंहने ५० व्या मिनिटाला भारताची आघाडी २-० ने घेतली. त्यानंतर भारताच्या बचावफळीकडून झालेल्या एका चुकीचा फायदा घेत पाकिस्तानच्या  मोहम्मदने आतिकने आपल्या संघाचा पहिला गोल नोंदवला. मात्र, पाकिस्तानला आघाडी घेण्यात अपयश आले.