PCB On Pakistan Cricket Team: सोमवारी अफगाणिस्तान विरूद्ध पाकिस्तान यांच्यात चेन्नईमध्ये सामना रंगला होता. या सामन्यात अफगाणिस्तानच्या टीमने पाकिस्तानचा पराभव केला. दरम्यान या सामन्यापूर्वी पाकिस्तानी टीमच्या ताफ्यात काही गोष्टी आलबेल नसल्याचं समोरं आलं आहे. काही रिपोर्ट्सच्या माहितीप्रमाणे, परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, पाकिस्तानी खेळाडू आणि बाबर आझम यांच्यामध्ये मारहाण झाली.
याशिवाय अनेक पाकिस्तानी पत्रकारांनी पाकिस्तान टीममध्ये झालेल्या या मारहाणीबाबत पोस्ट टाकल्या होत्या. या पत्रकारांचे म्हणण्यानुसार, पाकिस्तानी टीममध्ये काही गोष्टी आलबेल सुरु नाही आहेत. पाकिस्तानचे दोन खेळाडू एकमेकांशी भिडले. शिवाय बाबर आझमला खेळाडूंची साथ मिळत नाहीये. बाबर आझम टीममध्ये एकाकी पडला आहे.
पाकिस्तानी पत्रकारांनी सांगितलं की, पाकिस्तान-अफगाणिस्तान सामन्यानंतर ते संपूर्ण प्रकरणावर मोठा खुलासा करणार आहेत.
दरम्यान या प्रकरणाची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दखल केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलंय. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रसिद्धीपत्रक जारी करत, या संपूर्ण गोष्टी आणि वाद फेटाळून लावला आहे. वर्ल्डकप खेळणाऱ्या टीममधील खेळाडूंमध्ये कोणताही वाद नाहीये. आमच्या टीममध्ये सर्व काही ठीक चाललं असून काही मीडिया ग्रुप अफवा पसरवत असल्याचं, त्यांचं म्हणणं आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, काही मीडिया ग्रुप अफवा पसरवत आहेत. आमची टीममध्ये पूर्णपणे एकजूट आहे. जे दावे करण्यात येतायत त्यामध्ये कोणताही पुरावा नाही. अशा अफवांमुळे आम्ही निराश झालो आहोत. अफवा पसरवणाऱ्या मीडिया ग्रुपने पत्रकारितेच्या नैतिकतेची काळजी घ्यावी. अशा खोट्या अफवा टाळल्या पाहिजेत.