नवी दिल्ली: भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने पुन्हा एकदा आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले. बजरंगने ६५ किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची किमया केली आहे.
२४ वर्षांच्या बजरंग पुनियाने या हंगामात पाच पदकांवर नाव कोरले होते. यामध्ये राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक आणि जागतिक स्पर्धेतील रौप्यपदकाचा समावेश आहे.
या डोळे दिपवणाऱ्या कामगिरीमुळे बजरंगने 'यूडब्ल्यूडब्ल्यू'च्या क्रमवारीत ९६ गुणांसह पहिल्या स्थानावर झेप घेतली. दुसऱ्या क्रमांकावर असेल्या कुस्तीपटूपेक्षा बजरंग ३० गुणांच्या अंतराने पुढे आहे. क्युबाचा एलेजांद्रो एनरिक व्लाडेस टोबियर ६६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. रशियाचा अखमद चाकेइव ६२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
बजरंगसाठी हा हंगाम शानदार राहिला आहे. तो बुडापेस्ट येथे होणाऱ्या जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत पात्रता मिळवणारा एकमेव भारतीय कुस्तीपटू ठरला होता. मात्र, या कामगिरीनंतरही खेलरत्न हा मानाचा पुरस्कार बजरंग पुनियाला मिळाला नव्हता. त्याबद्दल बजरंगने नाराजीही व्यक्त केली होती.
दरम्यान जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान झाल्यानंतर बजरंगने समाधान व्यक्त केले. आपण जगातला सर्वोत्तम कुस्तीपटू व्हावे, असे प्रत्येक अॅथलीटचे स्वप्न असते. परंतु, जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून हे सर्वोत्तम स्थान मिळाले असते, तर मला आणखी आनंद झाला असता. मी सध्या खूप मेहनत करत असून पुढील वर्षी हे स्थान टिकवण्याचा प्रयत्न करेन, असे बजरंगने सांगितले.