पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रनं एमसीएला नोटीस बजावलीय. एमसीएनं गहुंजे स्टेडियमसाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेतलं होतं. त्याची साडे ६९ कोटी रक्कम थकवल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आलीय. तसंच ही रक्कम थकवल्याप्रकरणी स्टेडियम ताब्यात घेण्याची प्रक्रिया बँकेनं सुरू केल्याचंही बँकेनं नोटीशीत म्हटलंय.
हे मैदान बांधण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं(एमसीए) बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेतलं होतं. पण कर्जाचे हफ्ते न भरल्यामुळे बँकेनं ही कारवाई केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रनं स्टेडियम ताब्यात घेतलं असलं तरी यामुळे इकडे होणाऱ्या क्रिकेटवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असं एमसीएनं सांगितलं आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, कर्नाटक बँक आणि आंध्र बँकेनं एमसीएला कर्ज दिलं होतं. या बँकांचं नेतृत्व करत असल्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रनं एमसीएला नोटीस पाठवली आहे. या मैदानाचा आम्ही प्रातिनिधिक ताबा घेत असल्याचं या नोटीशीत लिहिण्यात आलंय.
हे स्टेडियम बांधून झाल्यानंतर एमसीए आणि सहारामध्ये २१५ कोटी रुपयांचा जाहिरातीचा करार झाला होता. पण या करारातून सहारानं माघार घेतली याचा फटका एमसीएला बसला. यानंतर एमसीएनं बीसीसीआय आणि सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेली प्रशासकीय समिती यांच्याकडे एमसीएच्या हिश्श्यातला निधी देण्याची मागणी केली आहे. एमसीएनं आता ४.५ कोटी रुपये बँकेला दिले आहेत. पण कारवाई टाळण्यासाठी एमसीएला आणखी १२ कोटी रुपये भरावे लागणार आहेत.
Bank of Maharashtra published a public notice on November 5 asking MCA Cricket Stadium, Pune for repayment of loan of Rs.69.5 Crore. The notice also mentions that the bank has taken symbolic possession of the stadium following non-payment of the loan by stadium authorities.
— ANI (@ANI) November 6, 2018