अंघोळ करताना कमी....; झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंना BCCI कडून तंबी

या मालिकेतील सर्व सामने झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथे होणार आहेत.

Updated: Aug 18, 2022, 08:33 AM IST
अंघोळ करताना कमी....; झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंना BCCI कडून तंबी title=

मुंबई : सध्या टीम झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही टीममध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथे होणार आहेत. यासाठी भारतीय टीम हरारे येथे पोहोचला आहे, मात्र येथे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या ठिकाणी समस्या आंघोळीच्या पाण्याची आहे. हरारेसह झिम्बाब्वेच्या बहुतांश शहरांमध्ये सध्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) भारतीय खेळाडूंना पाण्याच्या कमतरतेबाबत सूचना दिल्या आहेत.

बीसीसीआयने खेळाडूंना पाण्याचा अपव्यय टाळण्यास सांगितलंय. शक्य असल्यास दिवसातून एकदाच आंघोळ करा, तीही कमी पाण्याने. बीसीसीआयने खेळाडूंना पाणी वाया जाऊ देऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. याशिवाय अनेक निर्बंधही लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय खेळाडूंना सुमारे 30 अंश उष्णतेमध्ये पाण्याची समस्या भेडसावतेय.

पूल सेशनमध्ये कपात 

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने इनसाइडस्पोर्टने ही माहिती दिलीये. "सध्या हरारेमध्ये पाण्याची गंभीर समस्या आहे," असं अधिकाऱ्याने म्हटलं आहे. भारतीय खेळाडूंना याबाबत आधीच माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत पाण्याचा अपव्यय करू नका, असं खेळाडूंना सांगण्यात आलंय. कमी वेळ आणि कमी पाण्याने आंघोळ करा. पाणी बचतीसाठी पूल सेशनमध्येही कपात केली आहेत. 

हरारेत तीन आठवड्यांपासून पाणी नाही

झिम्बाब्वेच्या महिला राजकारणी लिंडा त्सुंगीरीराई मसारिरा यांनीही ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी लिहिलंय, 'पश्चिम हरारेसह उर्वरित राजधानीत जवळपास तीन आठवड्यांपासून पाणीपुरवठा नाही. पाणी हे जीवन आहे, त्याच्या अनुपस्थितीमुळे लोकांचं आरोग्य आणि स्वच्छतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य मंत्रालय आणि हरारे प्रशासनाने लोकांच्या जीवाशी खेळणे थांबवावं. तसेच लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करावी."