मुंबई : मिताली राजची ब्रिगेड आयसीसी महिला विश्वचषकात चमकदार कामगिरी बजावत आहे. अखेर बीसीसीआयने महिला संघातील प्रत्येक खेळाडूला ५० लाख रुपयांचं बक्षिस जाहीर केलं आहे.
लॉर्ड्सच्या मैदानावर कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वात रविवारी टीम इंडिया इंग्लंडचा सामना करणार आहे. भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
सहा वेळा विजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघावर ३६ धावांनी मात केल्यानंतर भारताने अंतिम फेरी गाठली आहे.
सीके खन्ना म्हणाले, ‘प्रत्येक सामन्यागणिक महिला संघाची कामगिरी उत्तमोत्तम होत चालली आहे. आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. विशेषतः हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियन संघाची उडवलेली दाणादाण.’
आपला शब्द पाळत त्यांनी महिला संघातील प्रत्येक खेळाडूला ५० लाख रुपयांचं रोख पारितोषिक घोषित केलं आहे. सर्पोटिंग स्टाफमधील प्रत्येकाला २५ लाख रुपये इनाम मिळणार आहे. बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सीके खन्ना यांनी महिला संघाचा यथोचित गौरव करणार असल्याचं शुक्रवारी जाहीर केलं होतं.
रविवारी टीम इंडियाचा सामना यजमान इंग्लंडशी होणार आहे. भारताने साखळी फेरीतच इंग्लंडला गारद केलं होतं, मात्र तरीही ‘साहेबीणीं’ना कमी लेखण्याची चूक मिताली राजची महिला ब्रिगेड करणार नाही, हे निश्चित.
आयसीसी महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने दुसऱ्यांदाच प्रवेश केला आहे. २००५ मध्ये अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मिताली राज आणि झुलन गोस्वामी त्यावेळीही टीम इंडियात होत्या.