आयपीएलच्या तोंडावर BCCI चा मोठा निर्णय; 'या' खेळाडूंचा वाढवणार पगार?

Indian Cricket Team : आयपीएलचा आगामी 17 वा हंगाम तोंडावर असताना आता बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बीसीसीआय (BCCI) काही खेळाडूंचा पगार वाढवणार आहे.

सौरभ तळेकर | Updated: Feb 27, 2024, 05:21 PM IST
आयपीएलच्या तोंडावर BCCI चा मोठा निर्णय; 'या' खेळाडूंचा वाढवणार पगार? title=
BCCI, test cricket

Salary of Indian Cricket Players : खेळाडूंची खऱ्या अर्थाने कसोटी घेणाऱ्या टेस्ट क्रिकेटकडे (Test Cricket) आता नवे खेळाडू नाक मुरडताना दिसत आहेत. सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत टीम इंडियामध्ये (Indian Cricket Team) खेळत नसलेल्या अव्वल रँकच्या खेळाडूंना बीसीसीआयने (BCCI) चांगलीच तंबी दिली. इशान किशनपासून अनेक खेळाडूंना रणजी खेळण्यासाठी बीसीसीआयने सांगितलंय. तरी देखील खेळाडूंनी बीसीसीआयच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली आहे. अशातच आता बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आगामी आयपीएलनंतर बीसीसीआय निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

सध्या सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत टीम इंडियाने दमदार कामगिरी करत इंग्लंडच्या बेझबॉलची हवा काढली. टीम इंडियाने या मालिकेत 3-1 ने विजयी आघाडी घेतली आहे. अशातच आता कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बोर्ड मोठा निर्णय घेऊ शकतं, अशी माहिती समोर आळी आहे. खेळाडूंना रणजी खेळण्याचा सल्ला दिल्यानंतर देखील खेळाडूंनी दुर्लक्ष केलंय. त्यामुळे बीसीसीआयने देखील खेळाडूंच्या या वृत्तीवर नाराजी व्यक्त केली. अशातच बीसीसीआय पगारीचं गाजर खेळाडूंना दाखवणार की काय? असा सवाल विचारला जातोय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय आता कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी पगाराची रचना करण्याच्या तयारीत आहे. ज्या खेळाडूने एका वर्षातील सर्व कसोटी सामने खेळले असतील तर  त्याला वार्षिक रिटेनर कॉन्ट्रॅक्ट व्यतिरिक्त बोनस देखील दिला जाणार आहे, अशी माहिती समोर येतीये. त्यामुळे आता कसोटी क्रिकेटला खरंच पुन्हा सोन्याचे दिवस येतील का? हे पाहणं औत्यसुक्याचं ठरणार आहे.

सध्या कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला बीसीसीआयकडून 15 लाख रुपये दिले जातात. तर वनडे सामना खेळणाऱ्या खेळाडूला 6 लाख रुपये, तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी 3 लाख रुपये दिले जातात. आयपीएलच्या बाबतीत रक्कम वेगवेगळी असते. आगामी आयपीएलच्या 17 व्या हंगामाला येत्या 22 मार्चपासून सुरूवात होत आहे. अशातच आता टी-ट्वेंटीकडे कल वाढत असल्याने कसोटी क्रिकेटमध्ये देखील बदल केले जातील का? अशी चर्चा देखील होत असल्याचं पहायला मिळतंय.