भुवनेश्वरच्या दुखापतीमुळे एनसीएवर प्रश्न, बुमराह-पांड्याचा जायला नकार

भारताचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार याला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे.

Updated: Dec 14, 2019, 09:09 PM IST
भुवनेश्वरच्या दुखापतीमुळे एनसीएवर प्रश्न, बुमराह-पांड्याचा जायला नकार title=

मुंबई : भारताचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार याला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. दुखापतीमुळे भुवनेश्वर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळू शकणार नाही. भुवनेश्वर पुन्हा एकदा अनफिट झाल्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए)च्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. एनसीएमध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांनी भुवनेश्वर फिट असल्याचं सर्टिफिकेट दिलं होतं. एनसीएच्या या कारभारामुळे हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहने एनसीएमध्ये जायला नकार दिला आहे.

प्रोटोकॉलनुसार करारबद्ध खेळाडूला एनसीएमध्ये रिहॅब करण्यासाठी जावं लागतं, पण पांड्या आणि बुमराहने आपण एनसीएमध्ये येणार नसल्याचं स्पष्ट केलं, असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला. यामुळे आता योगेश परमार हार्दिक पांड्यावर आणि नितीन पटेल बुमराहवर लक्ष ठेवून आहेत, असं अधिकारी म्हणाला.

करारबद्ध खेळाडूंना एनसीएमध्ये येणं गरजेचं असलं तरी धोका जास्त आहे आणि खेळाडू दुखापतीबाबत गंभीर आहेत. त्यामुळे खेळाडूंना त्यांचे निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य द्यायची गरज आहे, असं वक्तव्य बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने केलं.

भुवनेश्वर कुमारला हार्णियाचा त्रास आहे. वर्ल्ड कपनंतर भुवनेश्वर कुमार एनसीएमधून आत-बाहेर होत आहे. एनसीएमधली टीम भुवनेश्वरच्या दुखापतीला समजण्याच अपयशी ठरली आहे. भारताकडून २ मॅच खेळल्यानंतर भुवनेश्वरला पुन्हा दुखापत झाली आहे.

भुवनेश्वर हा ३ महिन्यांपासून बंगळुरुत एनसीएमध्ये आहे. एनसीएमध्ये भुवनेश्वरच्या कोणत्या चाचण्या झाल्या हे जाणून घेण्यापेक्षा मी हे सांगू शकतो की त्याची संपूर्ण माहिती घेण्यात आली होती, तरी त्याचा हार्णिया पूर्णपणे बरा झाला नाही. मुंबईला गेल्यानंतर तपासलं असता हे समोर आलं, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली.

खेळाडूंना एनसीएमध्ये अशी अडचण येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. ऋद्धीमान सहादेखील असंच एक उदाहरण असल्याची आठवण बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने करून दिली. फिटनेसबाबत अडचणी येत असल्याचं भुवनेश्वरने टीम प्रशासनाला सांगितलं ते योग्य केलं. एनसीएने तो फिट असल्याचं सांगितल्यावरच आम्ही त्याला निवडलं होतं. आम्ही प्रोटोकॉलचं पालन केलं होतं, असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.