IND vs AFG: वर्ल्डकप सुरु झाला असून आज भारताचा स्पर्धेतील दुसरा सामना रंगणार आहे. दिल्लीच्या अरूण जेटली मैदानावर हा सामना रंगणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया सलग दुसरा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया टीममध्ये काही बदल केले जाणार का याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. यावेळी अफगाणिस्तानविरूद्ध टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, हे पाहूया.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना संधी देण्यात आली होती. मात्र या सामन्यात किशन आणि श्रेयस अय्यर खराब शॉट खेळून बाद झाल्याने भारताला चांगली सुरुवात करता आली नाही. यावेळी रोहित ही चूक सुधारणार का हे पाहवा लागणार आहे. मात्र शुभमन गिलच्या अनुपस्थितीत ईशानला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. याशिवाय श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा सामना करणं टीम इंडियाला अवघड जाणार नाही. मैदान लहान असल्याने या सामन्यात फोर आणि सिक्सचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वर्ल्डकपपूर्वी पीचच पुनर्रचना करण्यात आली आहे, त्यामुळे त्याचे स्वरूपही बदललंय. हा सामना विराट कोहलीच्याच शहरात असल्याने चाहत्यांना त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. त्याचसोबत गेल्या सामन्यातील कामगिरीमुळे के.एल राहुलकडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या गोलंदाजांची कामगिरी चांगली होती. यावेळी मधल्या ओव्हर्समध्ये भारताने 6 विकेट्स घेतल्या. अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारताने तीन स्पिनर न घेतल्यास आर अश्विनची जागा मोहम्मद शमीला संधी मिळण्याची शक्यता आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.