खेळ सुधारा नाहीतर ... | कॅप्टन कोहलीची भारतीय खेळाडूंना तंबी

अन्यथा टीमबाहेर असलेल्या खेळाडूंना संधी द्यावी लागेल. असे विराट कोहली म्हणाला.  

Updated: Mar 9, 2019, 09:34 PM IST
खेळ सुधारा नाहीतर ... | कॅप्टन कोहलीची भारतीय खेळाडूंना तंबी title=

रांची : कॅप्टन विराट कोहलीने आपल्या टीममधील सातत्याने निराशाजनक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आपला खेळ सुधारण्याचा  ईशारा दिला आहे. टीममध्ये अपवादात्मक खेळाडू वगळता काही खेळाडू हे सातत्याने वाईट कामगिरी करत आहेत. यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागत आहे. तसेच खेळाडूंची घसरती कामगिरी ही आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने चांगले संकेत नाहीत. कोहलीने पुढील काही मॅचसाठी टीममध्ये बदल करणार असल्याचे संकेत दिले आहेत. फक्त खेळाडूंनी चांगली कामगिरी करुन चालणार नाही, तर  गरजेच्या वेळी खेळाडूंना टीमला विजय ही मिळवून देता यायला हवा. तसा खेळ खेळाडूंकडून अपेक्षित असणार आहे. काही दिवसात इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होत आहे. त्यामुळे खेळाडूंनी या वर्ल्ड कपच्या आधी आपल्या कामगिरीत सकारात्मक बदल करायला हवा. अन्यथा टीमबाहेर असलेल्या खेळाडूंना संधी द्यावी लागेल. असे विराट कोहली म्हणाला.

'ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या मॅचमध्ये ज्या प्रकारे ऑस्ट्रेलिया खेळत होती, त्या प्रकारे आपल्याला विजयासाठी ३५० रन्सचे आव्हान मिळेल असे वाटत होते. पण ग्लेन मॅक्सवेल आऊट झाल्याने ३१३ रन्सच करता आल्या. त्यामुळे आपण विजयी आव्हानाचं पाठलाग करु अशी आशा होती. पण एकूणच भारताची सुरुवात खराब झाली. भारताने पहिले तीन विकेट देखील स्वस्त्यात गमावले. धोनी आणि केदार सोबत अर्धशतकी पार्टनरशीप तर झाली. परंतू विजयापर्यंत पोहचता आले नाही. मी शतकी कामगिरी केली, पण विजयसाठी आवश्यक असलेल्या रन्स आणि शिल्लक बॉलमध्ये २० रन्सचा फरक असताना मी आऊट झालो. जेव्हा गरज होती, त्यामुळे मी आऊट झाल्याने मी स्वत:वर नाराज आहे' असे विराट म्हणाला.

नियमित अंतराने विकेट गेल्याने भारताचा तिसऱ्या मॅचमध्ये ३२ रन्सने पराभव झाला. तसेच सीरिजमध्ये २-१ अशी स्थिती झाली आहे. कोहलीला वगळता इतर कोणत्याही खेळाडूला ४० किंवा त्यापेक्षा अधिक रन्स करता आल्या नाही.

भारताची अपयशी कामगिरी

भारतीय बॉलर्सना तिसऱ्या मॅचमध्ये विकेटसाठी फार संघर्ष करावा लागला. भारताला पहिली विकेट ऑस्ट्रेलियाचा १९३ स्कोअर असताना मिळाली. त्यामुळे भारतीय बॉ़लर्सच्या कामगिरीचा प्रश्न देखील महत्वाचा आहे. तसेच गेल्या काही मॅचपासून भारताच्या सलामीच्या खेळाडूंना चांगली सुरुवात मिळवून देण्यास अपयश येत आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन हे सातत्याने अपयशी कामगिरी करत आहेत. या दोघांना सूर गवसत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या सलामीच्या जोडीकडून  आपल्या खेळीत बदल अपेक्षित आहे.

मधली फळीही अयशस्वी

मधल्या फळीतील काही अपवाद वगळता काही खेळाडू निराशाजनक कामगिरी करत आहेत. काही खेळाडूंना चांगली सुरुवात मिळते. पण त्यांना या खेळीचे मोठ्या खेळीत बदलता येत नाही. त्यामुळे खेळाडूंनी आपल्या कामगिरीत बदल करायला हवा, अशी चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये आहे.