सिडनी : कसोटी क्रिकेटमधून धोनीने निवृत्ती स्वीकारल्यापासून भारतीय संघाला त्याच्या सारखाच विकेटकीपर आणि बॅट्समॅनचा शोध होता. तो शोध आता पूर्ण झाला आहे असं काही भारतीय क्रिकेट चाहत्यांना वाटतं आहे. कारण भारताला ऋषभ पंतच्या रुपात विकेटकीपर आणि बॅट्समॅन भेटला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटीत ऋषभ पंतने नाबाद १५९ धावांची खेळी केली. या खेळीनंतर ऋषभवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. सुनील गावस्कर, मुरली कार्तिक आणि मायकल क्लार्क यांनी त्याचं कौतुक केलं आहे. यावेळी या तिन्ही क्रिकेटपटूंनी सोनी सिक्स या वाहिनीवर त्याचं कौतुक केलं आहे.
'भारताला ऋषभच्या रुपात एक चांगला विकेटकीपर-बॅट्समॅन मिळाला आहे. असा खेळाडू संघात असणं फायद्याचं ठरतं. विकेटकिपींगसह तो आपल्या फलंदाजीवर देखील लक्ष देत आहे. ऋषभची कामगिरी पाहता तो येत्या काळात एक मोठा खेळाडू म्हणून नावारुपास येईल. तसेच त्याची खेळण्याची पद्धत पाहता तो नक्कीच भविष्यात आणखी शतकं ठोकेल.' असा विश्वास क्लार्कने व्यक्त केला आहे.
सुनील गावस्कर यांनी ऋषभचं कौतुक करतांना म्हटलं की, 'ऋषभ या मालिकेआधी स्वत:च्या चुकीमुळे ९० पेक्षा जास्त धावा केल्यानंतर नर्व्ह्स नाईंटीचा शिकार झाला आहे. पण त्याने या चुकांमध्ये दुरुस्ती केली आहे. त्याने आपल्या चुकांची पुनरावृत्ती टाळली. सिडनीतील चौथ्या सामन्यात खेळताना त्याने जेव्हा ९० धावाचां टप्पा पार केला, तेव्हा तो संयमाने खेळत होता. यामुळे त्याने शतक साजरे केले. यावरुन असे दिसते की, तो याआधी केलेल्या चुकांमधून शिकत आहे. ही बाब त्याच्यासाठी आणि संघासाठी सकारात्मक आहेत. केवळ बॅटनेच नाही तर ऋषभ विकेटच्या मागून सुद्धा मदत करत आहे. तो ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाना डिवचत आहे. गेल्या कसोटीत तर त्याने टीम पेनला तू अल्पावधीसाठी असलेला कॅप्टन असल्याचं म्हटलं होतं. अशा बारीक गोष्टींच्या माध्यमातून ऋषभ आपल्या संघाला मदत करत आहे.'
'आक्रमकपणे फलंदाजी करणाऱ्यांच्या यादीत याआधी ऋषभचा देखील समावेश होता. पण त्यांने ही ओळख पूसली आहे. त्याने स्वत:वर असलेला आक्रमकपणाचा ठसा काढला आहे. जेव्हा ऋषभ खेळण्यासाठी मैदानात आला तेव्हाच तो फिट असल्याचे जाणवले. त्याने खेळताना घाई न करता वेळ घेतला. यामुळेच त्याने शतकीय कामगिरी केली. इतक्यावरच न थांबता त्याने, शतकाचं रुपांतर १५० धावांमध्ये केलं.' असं मुरली कार्तिकने म्हटलं.
ऋषभला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चारही कसोटी सामन्यात स्थान दिले गेले. पहिल्या तीन कसोटीत त्याने सरासरी कामगिरी केली असून त्याने सिडनीत सुरु असलेल्या चौथ्या सामन्यात नाबाद १५९ धावा केल्या आहेत. या खेळीमुळे त्याच्या आत्मविश्वासात वाढ झाली असणार. पुजारा आणि ऋषभच्या शतकी खेळीमुळेच भारताला ६०० पेक्षा जास्त धावांपर्यंत मजल मारता आली.
पहिला सामना - २५ आणि २८ धावा
दुसरा सामना - ३६ आणि ३० धावा
तीसरा सामना - ३९ आणि ३३ धावा
चौथ्या कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. भारताने पहिल्या डावात ७ विकेटच्या मोबदल्यात ६२२ धावा केल्या आहेत. जडेजा ८१ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार कोहलीने डाव घोषित केला. ऋषभने आपल्या कसोटी कारकिर्दीला इंग्लंड विरुद्धात सुरुवात केली. सिक्स मारुन त्याने आपल्या टेस्ट करिअरची सुरुवात केली. त्यावेळीच त्यात असलेली क्षमता दिसली होती. पंतने आतापर्यंत एकूण ९ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ४९.७१ च्या सरासरीने ६९६ धावा केल्या आहेत. यात २ शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे.