चोर-पोलीस खेळाप्रमाणे चक्क चिठ्ठ्या टाकून ठरायचा Team India चा ओपनर; रंजक खुलासा

Cheat System To Decide Opening Batters: सध्या भारतीय संघाची बांधणी सुरु असल्याचं दिसून येत आहे. यानिमित्त संघात अनेक प्रयोग सुरु असून कोण कुठे योग्य ठरु शकतो याची चाचपणी केली जात आहे. पण एकेकाळी चक्क चिठ्ठ्या टाकून सलामीवीर कोण असतील हे ठरवलं जायचं असं म्हटल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 3, 2023, 10:20 AM IST
चोर-पोलीस खेळाप्रमाणे चक्क चिठ्ठ्या टाकून ठरायचा Team India चा ओपनर; रंजक खुलासा title=
या संदर्भातील खुलासा एका माजी क्रिकेटपटूनेच दिल्लीतील कार्यक्रमात केला आहे

Cheat System To Decide Opening Batters: सध्या भारतीय क्रिकेट संघामध्ये अनेक प्रयोग सुरु आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये अनेक प्रयोग भारतीय संघाने केले. खास करुन सलामीवीर तसेच मधल्या फळीमध्ये तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली. या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेआधी संघाची बांधणी करण्याच्या दृष्टीने वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान हे प्रयोग करण्यात आले. एकीकडे भारतीय संघाची बांधणी करण्यासाठी प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा प्रयत्न करत असतानाच एकेकाळी भारतीय संघाचे सलामीवीर चक्क चिठ्ठ्या टाकून निवडले जायचे असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. यासंदर्भातील खुलासा नुकताच एका क्रिकेटपटूने दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात केला.

चिठ्ठ्या टाकून सलामीवीर निवडायचे

काँग्रेसचे नेते शशि थरुर यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये सेहवागने त्याच्या क्रिकेट करियरमधील काही किस्से सांगितले. दिल्लीतील या कार्यक्रमामध्ये सेहवागने पूर्वी चक्क चिठ्ठ्या टाकून सलामीवीर निवडायचे असं सांगितलं. म्हणजे आपण चोर-पोलीस हा कागदी चिठ्ठ्यांचा खेळ खेळताना जशा चिठ्ठ्या टाकतो तशाच चिठ्ठ्या टाकून सलामीवीर निवडले जायचे. विरेंद्र सेहवागने जॉन राईट प्रशिक्षक असतानाच्या कालावधीमध्ये चिठ्ठ्या टाकून सलामीला कोण येणार हे ठरवलं जायचं असा खुलासा केला आहे. खेळाडूंनी टाकलेल्या चिठ्ठीमध्ये ज्या खेळाडूंच्या नावाने जास्त मतं यायची ते फलंदाज सलामीवीर म्हणून भारतीय संघाकडून मैदानात उतरायचे, असं सेहवाग म्हणाला.

15 पैकी एकच चिठ्ठी विरोधात

2003 च्या वर्ल्डकप स्पर्धेमध्ये तत्कालीन कर्णधार सौरव गांगुली सलामीवीर म्हणून का आला नव्हता याबद्दल खुलासा करताना सेहवागने हे विधान केलं. "संघामध्ये चिठ्ठीची पद्धत वापरली जायची. सर्व खेळाडूंना विचारलं जायचं की कोणी सलामीवीर म्हणून गेलं पाहिजे. त्यावेळेस 14 खेळाडूंनी सचिन-सेहवाग सलामीवीर म्हणून जावेत असं लिहिलेल्या चिठ्ठ्या टाकल्या होत्या. एका चिठ्ठीमध्ये सचिन-गांगुलीने सलामीवीर म्हणून जावं असं लिहिलेलं. ही चिठ्ठी गांगुलीनेच लिहिली होती," असं सेहवाग म्हणाला होता. 

वर्ल्डकप जिंकू असं कोणालाही वाटत नव्हतं

2003 च्या वर्ल्डकप स्पर्धेबद्दल बोलताना सेहवागने, "कोणलाही विश्वास बसत नव्हता की आपण 2003 चा विश्वचषक जिंकू. 2003 नंतर संघामध्ये न घाबरता निर्णय घेण्यास सुरुवात झाली," असंही म्हटलं. ऑस्ट्रेलियाने 2003 च्या वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभूत केलं होतं. याच कार्यक्रमामध्ये सेहवागने जॉन राईट यांनी एकदा रागात आपली कॉलर पकडल्याचा किस्साही सांगितला होता. त्यानंतर आपण संतापून संघ व्यवस्थापक राजीव शुक्ला यांच्याकडे तक्रार केली होती. जॉन राईट यांनी आपली माफी मागावी यावर मी अडून बसलो होतो असंही सेहवागने म्हटलं होतं. नंतर जॉन राईट यांनी सेहवागच्या रुममध्ये जाऊन त्याची माफी मागितली होती. त्यानंतर सचिन तेंडुलकरने हे प्रकरण अधिक पुढे नेता कमा नये म्हणत कुठेही चर्चा न करण्याचा सल्ला दिल्याने ते कुठेही बाहेर आलं नाही, असंही सेहवागने स्पष्ट केलं.