When Virat Kohli Caught Prithvi Shaw In Washroom: इंडियन प्रिमिअर लीगच्या मेगा लिलावामध्ये बोली न लागल्याने सध्या पृथ्वी शॉ चर्चेत आहे. सध्याच्या भारतीय संघामध्ये पृथ्वी शॉला स्थान नसलं तरी त्याच्या संदर्भातील अनेक किस्से सोशल मीडियावर आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. एकेकाळी भारतीय संघातील उगवता तारा अशी ओळख अगदी अल्पावधित मिळवलेल्या पृथ्वीची विराट कोहलीने केलेली एक फजेती चर्चेत आहे. त्यावेळी पृथ्वी हा भारतीय संघाचा भाग होता. या नवख्या खेळाडूला विराट कोहली चांगलाच घाम फोडला होता.
'फोकस्ड इंडियन' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पृथ्वी शॉने त्याचं घर कसं आहे हे दाखवलं होतं. तसेच यावेळेस वेगवेगळ्या क्रिकेटपटूंसंदर्भात बोलताना पृथ्वीनेच विराटने कशाप्रकारे त्याची फजेती केलेली हे ही सांगितलेलं. "इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मी ड्रेसिंग रुममध्ये होते. मी त्यावेळेस अश्वीन आणि मोहम्मद शमी बरोबर होतो. मी त्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हतो. आम्हाला ड्रेसिंग रुममध्ये काहीही ऐकू येत नव्हतं. मी वॉशरुमजवळ होतो तेव्हा विराट तिथे आला," असं पृथ्वी शॉ म्हणाला. यानंतर पुढे विराट जे काही म्हणाला ते फारच मजेदार होतं असं पृथ्वीने सांगितलेला पुढचा किस्सा वाचल्यावर तुमच्या लक्षात येईलच.
"विराटने माझ्याकडे काही सेकंद निरखून पाहिलं आणि मला विचारलं, 'तू इथे काय करतो? तुला माहिती नाही का विकेट पडलीय? त्यानंतर त्याने मला बाहेर जाऊन बघ असं सांगितलं. ते ऐकून मी मैदानात पळत गेलो तर तिथे कोणीच नव्हतं. काही मिनिटांपूर्वीच लंच झाला होता. नंतर मला कळलं की त्याने मला उगाच पळवलं. मी पळत गेलो पण मैदानात कोणीच नव्हतं," असं पंत म्हणाला. "मी आता गेलो आणि त्याला सांगितलं की लंच झाला आहे. त्यावर विराटने मला, तुझ्या लक्षात नव्हतं ना लंच झाला आहे? खरं सांग, असं म्हटलं होतं," अशी आठवण पृथ्वीने हसतच सांगितली.
विराटबरोबर ड्रेसिंग रुम शेअर करता आली या अनुभवासंदर्भात त्याला विचारलं असता पृथ्वीने, "मैदानावर तो क्रिकेटबद्दल फारच गंभीर असतो. मात्र मैदानात नसताना तो फार निवांत असतो. तो अनेकदा मज्जा, मस्करीच्या मूडमध्ये असतो. खास करुन रोहित शर्मा सोबत असताना. ते एखाद्या तरुण खेळाडूला पकडून आज आपण याची मज्जा घेऊयात असं ठरवूनच येतात," असं सांगितलं.
पृथ्वी शॉ भारतीय संघाकडून पाच कसोटी सामने सलामीवीर म्हणून खेळला आहे. त्याने त्याच्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशविरुद्ध शतक झळकावलं होतं. मात्र अॅडलेडवरील भारताच्या लाजिरवाण्या 36 वर ऑल आऊट संघातही पृथ्वी शॉ होता. त्यानंतर तो भारतासाठी कसोटी खेळलेला नाही.