कोरोना पाठोपाठ IPLवर नवं संकट; सप्टेंबरमध्ये मॅचेस घेतल्यास होणार मोठं नुकसान

IPL 2021चे सामने तूर्तास अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहेत.

Updated: May 13, 2021, 02:58 PM IST
कोरोना पाठोपाठ IPLवर नवं संकट; सप्टेंबरमध्ये मॅचेस घेतल्यास होणार मोठं नुकसान title=

मुंबई: बायो बबलमध्ये कोरोना घुसल्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेखातर IPL 2021चे सामने तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत. हे 31 सामने पुन्हा कधी घ्यायचे याबाबत चर्चा सुरू आहे. एकीकडे IPLवर कोरोनाचं संकट आहेच तर दुसरीकडे आता आणखी अडचणी समोर येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

IPL 2021चे उर्वरित सामने भारतात होणार नाहीत. यूएई किंवा इंग्लंडमध्ये आयोजित करण्याबाबत विचार सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंसमोर पेच असताना आता न्यूझीलंडचे खेळाडू देखील IPLपासून दूर राहणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंड संघाचा पाकिस्तान दौरा आहे. हा दौरा पूर्वनियोजित आहे. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड 3 वन डे आणि 3 टी 20 सामन्यांची सीरिज खेळवली जाणार आहे. ही सीरिज रद्द किंवा स्थगित करणं शक्य नाही. त्यामुळे इथल्या खेळाचा परिणाम अर्थातच संघावर होणार असल्यानं न्यूझीलंडचे खेळाडू माघार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

इंग्लंडचे खेळाडूही माघार घेण्याची शक्यता

जूननंतर इंग्लंड क्रिकेट संघाचे क्रिकेट वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे. त्यामुळे आयपीएलचे उर्वरित सामने यावर्षी पुन्हा घेण्यात आले तर इंग्लंडचे क्रिकेटपटू खेळू शकणार नाहीत. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंसमोर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

ईसीबी क्रिकेटचे संचालक एशले जिल्स यांनी ही माहिती दिली. इंग्लंडची टीम सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान बांग्लादेश दौऱ्यावर असणार आहे. टी 20 वर्ल्डकपनंतर एशेज सीरिज खेळवली जाणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या क्रिकेट टीमचं एकूणच शेड्युल खूप वस्त राहणार आहे. IPLच्या वेगवेगळ्या टीममध्ये इंग्लंडचे 11 खेळाडू सहभागी झाले होते. त्यामुळे आता त्यांच्यासमोर काय करायचं असा पेच निर्माण झाला आहे.