'आम्हाला पैशांची गरज नाही'; भारतीय क्रिकेटपटूने शोएब अख्तरला सुनावलं

जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे.

Updated: Apr 9, 2020, 04:59 PM IST
'आम्हाला पैशांची गरज नाही'; भारतीय क्रिकेटपटूने शोएब अख्तरला सुनावलं title=

मुंबई : जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. भारत आणि पाकिस्तानमध्येही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. कोरोनाविरुद्धच्या या लढाईसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ३ वनडे मॅचची सीरिज खेळवा. या सीरिजमधून मिळणारा पैसा कोरोनाचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांनी वापरावा, असा प्रस्ताव पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने ठेवला होता. शोएब अख्तरच्या या प्रस्तावावर भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी टीका केली आहे. भारताला पैशांची गरज नाही. क्रिकेट मॅचसाठी जीव धोक्यात घालणं योग्य नाही, असं कपिल देव म्हणाले आहेत.

'शोएब अख्तरला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण आपल्याला पैसे गोळा करण्याची गरज नाही. आपल्याकडे भरपूर पैसे आहेत. संकटाच्या या काळात आपल्या संस्था एकत्रितपणे कसं काम करतील, हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. राजकारण्यांकडून अजूनही आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं मी टीव्हीवर बघत आहे. आपण हे थांबवलं पाहिजे,' असं कपिल देव म्हणाले.

'बीसीसीआयने कोरोनाचा सामना करण्यासाठी पीएम केयर्स फंडाला ५१ कोटी रुपये दिले आहेत. आणखी मदत लागली तरी बीसीसीआय ते देऊ शकतं. यासाठी फंड गोळा करण्याची गरज नाही. परिस्थिती लवकर नियंत्रणात येईल, असं दिसत नाही. त्यामुळे आपल्या क्रिकेटपटूंचं आयुष्य धोक्यात टाकणं गरजेचं नाही. पुढचे ६ महिने क्रिकेट महत्त्वाचं नाही,' असं मत कपिल देव यांनी मांडलं.

'३ वनडे खेळून किती पैसे मिळणार? लोकांचं आयुष्य वाचवणं आणि गरिबांची काळजी घेणं हेच सध्याचं प्रमुख लक्ष्य असलं पाहिजे. परिस्थिती सामान्य होईल तेव्हा क्रिकेट सुरू होईलच', असा विश्वास कपिल देव यांनी व्यक्त केला. 

'माझा देश अमेरिका आणि इतर देशांची मदत करतोय हे पाहून भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. दुसऱ्यांची मदत करणं ही आमची संस्कृती आहे. दुसऱ्यांना मदत केल्याबद्दल आपण श्रेय घेऊ नये. आपण देश म्हणून इतरांकडून घेण्यापेक्षा दुसऱ्यांना जास्तीत जास्त द्यावं,' असं वक्तव्य कपिल देव यांनी केलं.

कपिल देवही इतर नागरिकांप्रमाणे घराबाहेर पडत नाहीत. नेल्सन मंडेला २७ वर्ष छोट्याशा कारागृहात राहिले. आपल्याला तर फक्त आपल्या घरातर राहिचं आहे. आयुष्यापेक्षा मोठं काहीही नाही. आपल्याला आयुष्य वाचवायची आहेत, त्यामुळे घरातच राहा, असं आवाहनही कपिल देव यांनी केलं आहे.