नोएडा स्टेडिअमधल्या कृतीने बीसीसीआयची नाचक्की, वॉशरुमच्या पाण्याने बनवलं खेळाडूंसाठी जेवण?

NZ vs AFG : न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानदरम्यान भारतात कसोटी सामना खेळवला जात आहे. दिल्लीतल्या नोएडा क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना नियोजित करण्यात आला आहे, पण सामन्याचा दुसरा दिवसही रद्द झालाय. या दरम्यान स्टेडिअममधल्या कर्मचाऱ्यांच्या लाजीरवाणी कृती समोर आली आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 10, 2024, 07:42 PM IST
नोएडा स्टेडिअमधल्या कृतीने बीसीसीआयची नाचक्की, वॉशरुमच्या पाण्याने बनवलं खेळाडूंसाठी जेवण? title=

NZ vs AFG Test Greater Noida Stadium : न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानदरम्यानचा कसोटी (New Zealand vs Afghanistan Test) सामना ग्रेटर नोएडा स्टेडिअमवर (Noida Cricket Stadium) खेळवला जाणार आहे. पण मैदानाच्या स्थितीने संपूर्ण जगात बीसीसीआयची (BCCI) नाचक्की झाली आहे. पावसामुळे मैदानाची अवस्था बिकट झाली असून मैदान सुखवण्यासाठी चक्क टेबल फॅन वापरण्यात आले. हे कमी की काय आता खेळाडू आणि स्टाफला देण्यात येणाऱ्या जेवणाबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. सोशल मीडियावर स्टेडिअमधले काही फोटो व्हायरल झाले असून जेवण बनवण्यासाठी कर्मचारी चक्क वॉशरुमधल्या पाण्याचा वापर करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

मैदानाची वाईट अवस्था

न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान सामन्यासाठी बीसीसीआयने यजमानपद भूषवण्याची तयारी दाखवल्यानंतर बीसीसीआयचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. या सामन्यासाठी बीसीसीआयने दिल्लीतल्या नोएडा क्रिकेट स्टेडिअमची निवड केली. पण या स्टेडिअमची अवस्था इतकी बिकट आहे की दोन दिवस टॉसही होऊ शकलेला नाही. सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानाची अवस्था पाहून अफगाणिस्तानच्या प्रशिक्षक आणि खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. खराब व्यवस्था आणि अनुभव नसलेल्या कर्मचाऱ्यांमुळे दोन्ही संघाचे खेळाडू नाखुष दिसले. अफगाणिस्तानच्या एका अधिकाऱ्याने तर 'मोठी गडबड आहे, आम्ही परत इथे कधी येणार नाही' असंही म्हटलं.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मैदानावर ही परिस्थिती असताना मैदानाच्या बाहेरही विचित्र घडत होतं. स्टेडिअमच्या आचाऱ्याने वॉशरुमच्या पाण्याने जेवण बनवण्यासाठीची भांडी धुतली. त्यानंतर हेच पाणी जेवण बनवण्यासाठी वापरण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले आहेत. यानंतर क्रिकेट क्षेत्रातून यावर टीका केली जात आहे.

सलग दुसऱ्या दिवशी सामना रद्द

उत्तर भारतात गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे ग्रेटर नोएडाच्या मैदानात पाणी साचलं आहे. खेळपट्टी ओली असल्याने सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. इतकंच काय तर टॉसही उडवण्यात आला नाही. दुसऱ्या दिवशीही तिच अवस्था होती. ग्राऊंड स्टाफने खेळपट्टी आणि मैदान सुकवण्यासाठी असमर्थता दाखवली. त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळही टॉस न होताच रद्द करण्यात आल्याचं घोषित करण्यात आलं.