ICC Team Rankings: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2024-25 दरम्यान भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी क्रमवारीत (Test Ranking) भारतीय कसोटी संघाची (India Test Team) घसरण झाली आहे. आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय क्रिकेट संघ दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. टीम इंडियाला (Team India) एका स्थानाचं नुकसान झालं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 चा विजेता संघ ऑस्ट्रेलिया कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 124 अंक जमा आहेत.
ऑस्ट्रेलियाची अव्वल स्थानावर झेप
आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला मागे टाकलं आहे. ओव्हलमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियाने भारतावर 209 धावांनी मात केली होती. टीम इंडियाच्या खात्यात 120 पॉईंट जमा आहेत. कसोटी क्रमवारीत तिसऱ्य क्रमांकावर इंग्लंडचा संघ असून त्यांच्या खात्यात 105 पॉईंट जमा आहेत. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 96 आणि पाचव्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडच्या खात्यात 89 पॉईंट जमा आहेत.
कसोटी क्रमवारीत पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर आहे, त्यांच्या खात्यात 89 पॉईंट जमा आहेत. श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि झिम्बाब्वे अनुक्रमे सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहे.
एकदिवस आणि टी20त अव्वल
कसोटी क्रमवारीत टीम इंडियाची घसरण झाली असली तरी एकदिवसीय आणि टी20 क्रमवारीत मात्र भारताचा जलवा कायम आहे. एकदिवसीय क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर असून भारताच्या खात्यात 122 पॉईंट जमा आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 116 पॉईंट आहेत. एकदिवसीय क्रमवारीत दक्षिण आफ्रिका तिसऱ्या तर पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे. आफ्रिकेच्या खात्यात 112 तर पाकिस्तनच्या खात्यात 106 पॉईंट जमा आहेत.
टी20 क्रिकेटमध्ये तर टीम इंडियाची बादशाहत आहेत. टी20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या टीम इंडियाच्या खात्यात तब्बल 264 पॉईंट आहेत. टी20 क्रमावारीतही ऑस्ट्रेलिया भारताच्या एका पाऊल खाली म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. टी20 क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान सातव्या क्रमांकावर असून वेस्टइंडिजचा संघही त्यांच्या एका पाऊल पुढे आहे. श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत. या यादीत 20 संघांचा समावेश करण्यात आला आहे.