IND vs AUS, 5th T20I: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या पाच टी20 सामन्यांचा (T20 Series) मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज खेळवला जातोय. बंगळुरुमधल्या (Bengaluru) चिन्नास्वामी स्टेडिअमवर भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने पाच सामन्यांची ही मालिका 3-1 अशी आधीच जिंकली आहे. आता पाचव्या सामन्याआधी टीम इंडियात मोठी घडामोड पाहिला मिळणार आहे. गेले चार सामने संधी न मिळालेल्या खेळाडूंना पाचव्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.
सलामीची जबाबदारी
टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडला या सामन्यात विश्रांती देण्याची शक्यता आहे. सलामीला ईशान किशनला संधी मिळण्याची शक्यता आहे. ईशान किशन आणि जशस्वी जयस्वाल टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करतील. दोघंही आक्रमक फलंदाज असल्याने सुरुवातीला मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल.
मधली फळी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर येऊ शकतो. चौथ्या सामन्यात मोठी खेळी करण्यात अय्यरला अपयश आलं होतं. चौथ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादव तर पाचव्या क्रमांकावर फिनिशर रिंकू सिंहला संधी मि ळेल. सहव्या स्थानावर विकेटकिपर फलंदाज जितेश शर्माला देण्यात येईल. चौथ्या सामन्यात जितेश शर्माने तुफान फलंदाजी केली होती.
ऑलराउंडर्स
पाचव्या सामन्यात ऑलराऊंडर खेळाडू म्हणून वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळेल. वॉशिंग्टन सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. संघात असलेल्या अक्षर पटेलला विश्रांती देण्याची शक्यता आहे. वॉशिंग्टन गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही उपयुक्त ठरू शकतो.
गोलंदाजीतही बदल
संघात फिरकीची जबाबादारी रवी बिश्नोईवर असेल. तर पाचव्या सामन्यात कर्णधार सुर्यकुमार यादव वेगवान गोलंदाजीसाठी दीपक चाहर, आवेश खान आणि मुकेश कुमार यांना संधी देईल. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला बाहेर बसवण्याची शक्यता आहे. पहिल्या तीन सामन्यात अर्शदीप सिंग खूपच महागडा ठरला होता. त्यामुळे चौथ्या सामन्यातून त्याला वगळण्यात आलं होतं. आता पाचव्या सामन्यातही त्याला बेंचवरच बसावं लागणार आहे.