Ind vs Eng 5th Test : भारत आणि इंग्लंडदरम्यानचा पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिशएनच्या स्टेडिअमवर खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसावरही भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिलने (Shubman Gill) शतकी खेळी करत टीम इंडियाला मजबूत पकड मिळवून दिलीय. रोहित शर्माने 103 धावा केल्या. कसोटी कारकिर्दीतील हे त्याचं बारावं शतक ठरलं. तर शुभमन गिलने 110 धावा केल्या. गिलचं कसोटी कारकिर्दीतील हे चौथं शतक होतं.
रोहित-गिलची मजबूत भागिदारी
रोहित शर्माने 154 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. तर शुभमन गिलने 137 चेंडूत शतक ठोकलं. विशेष म्हणजे या कसोटी मालिकेतील दोघांचंही हे दुसरं शतक होतं. रोहित शर्मा 103 धावांवर असताना बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर क्लिन बोल्ड झाला. तर शुभमन गिल 110 धावांवर जेम्स एंडरसनच्या गोलंदाजीवर पॅव्हेलिअनमध्ये परतला. गिलने आपल्या शतकी खेळीत 12 चौकार आणि 5 षटकार ठोकले, तर रोहितने 13 चौकार आणि तीन षटकारांची बरसात केली.
रोहित शर्माचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील हे 48 वं शतकं होतं. यात 43 शतकं रोहित शर्माने सलामीला येत केली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) सर्वाधिक शतक करणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला मागे टाकलंय. गिलच्या नावावर 42 शतकं केलीत.
रोहितने द्रविड-गावसकार-सचिनशी केली बरोबरी
रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतक करणारा भारतीय सलामीवीर ठरला आहे. त्याने सुनील गावसकर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. गावसकर यांनी इंग्लंडविरुद्ध सलामीला फलंदाजी करत चार शतकं ठोकली आहेत. रोहितने द वॉल राहुल द्रविडच्या आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मागे टाकला आहे. रोहितने वयाच्या तिशीनंतर 35 वं आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं. सचिन तेंडुलकरनेही वयाच्या 30 नंतर 35 वं शतकं केलं होतं.
भारतासाठी सर्वात जास्त कसोटी शतकं
6- रोहित शर्मा
4- शुभमन गिल
3- रवींद्र जडेजा
3- यशस्वी जयसवाल
3- ऋषभ पंत
3- केएल राहुल
इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतकं (भारतीय सलामीवीर)
4 - सुनील गावस्कर
4 - रोहित शर्मा
3 - विजय मर्चंट
3 - मुरली विजय
3 - केएल राहुल
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधक शतक (सलामीवीर)
49- डेविड वॉर्नर
45- सचिन तेंडुलकर
43- रोहित शर्मा
42- ख्रिस गेल
41- सनथ जयसूर्या
40- मॅथ्यू हेडन
अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक (भारतीय फलंदाज)
100- सचिन तेंडुलकर
80- विराट कोहली
48- राहुल द्रविड
48- रोहित शर्मा
38- वीरेंद्र सेहवाग
38- सौरव गांगुली
धर्मशाला कसोटीत भारताची प्लेईंग-11 : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.
धर्मशाला कसोटीत इंग्लंडची प्लेईंग-11 : जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, मार्क वुड, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.