6 चेंडूत 10 धावा! जसप्रीत बुमराह की नसीम शाह, शेवटची ओव्हर कोणाला? बाबर आझमने दिलं उत्तर

Babar Azam on Naseem Shah or Jasprit Bumrah : रोमहर्षक सामन्यात विरोधी संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूत 10 धावांची गरज आहे. अशात जसप्रीत बुमराह कि नसीम शाहपैकी कोणत्या गोलंदाजाला ओव्हर देशील असा प्रश्न बाबर आझमला विचारण्यात आला. यावर बाबरने आश्चर्यचकित करणारं उत्तर दिलं.

राजीव कासले | Updated: Apr 12, 2024, 08:51 PM IST
6 चेंडूत 10 धावा! जसप्रीत बुमराह की नसीम शाह, शेवटची ओव्हर कोणाला? बाबर आझमने दिलं उत्तर title=

Babar Azam picks Naseem Shah over Jasprit Bumrah: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टॉपच्या वेगवान गोलंदाजामध्ये सर्वात पहिलं नाव घेतलं जातं ते म्हणजे टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहचं. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) टीम इंडियाला अनेक सामन्यात विजय मिळवून दिला आहे. बुमराहच्या यॉर्करचा तर भलेभले फलंदाजही धसका घेतात. विशेषत: डेथ ओव्हरमध्ये बुमराह जास्त घातक गोलंदाज असतो. दुसरीकडे पाकिस्तानचा युवा गोलंदाज नसीम शाहने देखील अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप उमटवली आहे. दुखापतीमुळे नसमी शाह (Naseem Shah) एकदिवसीय विश्वचषकाला मुकला आणि याचा मोठा फटका पाकिस्तान संघाला बसला. 

बुमराह की नसीम शाह
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) एका मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला. रोमहर्षक सामन्यात विरोधी संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूत 10 धावांची गरज आहे. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह कि नसीम शाहपैकी कोणत्या गोलंदाजाला ओव्हर देशील असा प्रश्न बाबर आझमला विचारण्यात आला. यावर बाबरने आश्चर्यचकित करणारं उत्तर दिलं.

बाबरचं आश्चर्यचकीत करणारं उत्तर
सामन्याच्या शेवटच्या षटकात विरोधी संघाला विजयासाठी 6 धावांची गरज असेल तर नसीम शाहकडे चेंडू सोपवेन असं उत्तर  पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने दिलं. बाबर आझमने जसप्रीत बुमराहऐवजी नसीम शाहला डेथ ओव्हरमध्ये फेव्हरेट गोलंदाज असल्याचं म्हटलं आहे. बाबरच्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे. शेवटच्या षटकात यॉर्कर टाकण्यात बुमराहसारखा गोलंदाज नाही असं क्रिकेट चाहत्यांचं म्हणणं आहे. 

नसीम शाहची क्रिकेट कारकिर्द
पाकिस्तानचा युवा गोलंदाज नसीम शाहने आतापर्यंत 17 कसोटी सामन्यात 51 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय 14 एकदिवसीय सामन्यात 32 विकेट त्याच्या नावावर जमा आहेत. तर 19 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नसीमने आतापर्यंत 15 विकेट घेण्यात यश मिळवलंय. पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये नसीमने 99 सामन्येत 102 विकेट घेतल्या आहेत. 

जसप्रीच बुमराहची क्रिकेट कारकिर्द
भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या 36 कसोटी सामन्यात तब्बल 159 विकेट घेतल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 149 विकेट जमा आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या या दिग्गज गोलंदाजाने 62 सामन्या 74 विकेट घेतल्यात. एकूण टी20 कारकिर्दीचा आढाव घेतला तर बुमराहने 216 सामन्यात 265 विकेट घेतल्यात.