Shubman Gill Can Replace KL Rahul: भारतीय संघातील माजी खेळाडू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) शुभमन गिल आणि के. एल. राहुलसंदर्भात (KL Rahul) मोठं विधान केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) होणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये गिल (Shubman Gill) हा राहुलच्या जागी सलामीवीर म्हणून भारतीय संघाकडून खेळताना दिसू शकतो असं कैफ म्हणाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आपल्या पहिल्या दोन डावांमध्ये के. एल. राहुलला विशेष प्रभाव पाडता आळा नाही तर तुम्ही त्याच्या जागी शुभमन गिलला भारतीय संघासाठी ओपनिंग करताना पाहू शकता, असं कैफ म्हणाला आहे. सध्या शुभमन एकदिवसीय क्रिकेट, कसोटी आणि टी-२० मध्ये तुफान फॉर्मात असल्याचं दिसत आहे. गिलने बुधवारी (1 फेब्रुवारी 2023 रोजी) पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेमधील शेवटच्या सामन्यात नाबाद 126 धावांची खेळी करत भारताला 168 धावांनी सामना आणि मालिका विजय मिळून देण्यात मोलाचं योगदान दिलं होतं. या शकताबरोबरच गिल तिन्ही पद्धतीच्या क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पाचवा आणि सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू ठरला आहे.
स्टार स्पोर्ट्सवरील एका चर्चा सत्रामध्ये सहभागी झालेल्या मोहम्मद कैफला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरीजमध्ये शुभमन गिलला ओपनिंगला पाठवणं योग्य ठरेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, "के. एल. राहुल उपकर्णधार असला तरी असं होऊ शकतं असं मला वाटतं. मला विश्वास आहे की ओपनर म्हणून राहुललाच संधी दिली जाईल. के. एल. राहुलवर फार दबाव असेल. त्याला वेगाने धावा जमवून आपला प्रभाव पाडावा लागेल. एखाद्या दोन डावांमध्ये त्याचा चांगली कामगिरी जमली नाही तर के. एल. राहुलच्या जागी शुभमन गिल ओपनिंग करताना दिसू शकतो," असं कैफ म्हणाला.
शुभमन गिल नक्कीच मधल्या फळीमध्ये या सीरीजमध्ये खेळेल असा विश्वास कैफने व्यक्त केला. "शुभमन गिल पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर खेळू शकतो. तो उत्तम कामगिरी करणार यात शंका नाही. चेतेश्वर पुजारा तिसऱ्या आणि विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. श्रेयस अय्यर अजून खेळण्यासाठी फिट झालेला नाही. त्यामुळे शुभमन सध्या पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर खेळू शकतो," असं कैफ म्हणाला.
शुभमनला अंतिम 11 खेळाडूंमध्ये संधी मिळेल असा विश्वास आपल्याला वाटत असल्याचं कैफ म्हणाला. "शुभमन गिल असा खेळाडू आहे ज्याला तुम्ही पहिल्या लाइनअपमध्ये पाहू इच्छिता. त्यामुळे तो या संघात कुठे ना कुठे आपली जागा नक्कीच तयार करेल. सध्या तो उत्तम फॉर्ममध्ये आहे. तो उत्तम फलंदाज आहे. त्याच्या फलंदाजीची शैली अगदी साधी, सरळ आणि सोपी आहे," असं कैफ म्हणाला.
शुभमने आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 32 च्या सरासरीने 736 धावा केल्या आहेत. त्याचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्ड उत्तम आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये 51.80 च्या सरासरीने 259 धावा केल्या आहेत. यामध्ये गाबावरील ऐतिहासिक विजयामधील 91 धावांच्या खेळीचाही समावेश आहे.