दक्षिण आफ्रिकेची WTC पॉईंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप, विजयासाठी भारतावर दबाव वाढला

दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला पहिल्या टेस्ट सामन्यामध्ये 7 विकेट्सने पराभूत केलं. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 106 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने सहज पूर्ण केलं. 

पुजा पवार | Updated: Oct 24, 2024, 02:41 PM IST
दक्षिण आफ्रिकेची WTC पॉईंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप, विजयासाठी भारतावर दबाव वाढला title=
(Photo Credit : Social Media)

WTC Point Table :  दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश (South Africa VS Bangladesh) यांच्यात टेस्ट सीरिज खेळवली जात असून यांच्यातील पहिला सामना हा दक्षिण आफ्रिकेने जिंकून WTC पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला पहिल्या टेस्ट सामन्यामध्ये 7 विकेट्सने पराभूत केलं. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 106 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने सहज पूर्ण केलं. यासह त्यांनी दोन सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये 1-0  ने आघाडी घेतली आहे.

दक्षिण आफ्रिका  विरुद्ध बांगलादेश यांच्यात मीरपूर येथे टेस्ट सीरिजमधील पहिला सामना पार पडला. दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशची  पहिली इनिंग 106 धावांवर आटोपली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी करताना 308 धावा केल्या. त्यामुळे त्यांना 202 धावांची लीड मिळाली. बांगलादेशने फलंदाजीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये सन मिराज (97) च्या खेळीवर 307 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 106 धावांचं आव्हान दिलं. 

हेही वाचा : Video: धर्म प्रसारकाच्या कार्यक्रमात भारतीय महिला क्रिकेटपटू! मंत्र म्हणताच बेशुद्ध पडली अन्...

 

आशिया देशांमध्ये टेस्ट क्रिकेटच्या चौथ्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचा रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही. यात त्यांची प्रतिमाही चोकर्सची राहिली. अशा स्थितीत बांगलादेशच्या चाहत्यांना आशा होती की, त्यांचा संघ हा सामना जिंकेल. पण दक्षिण आफ्रिकेने त्यांना यावेळी कोणतीही संधी दिली नाही आणि 3 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेने आशियाई खेळपट्ट्यांवर 100 हून अधिक धावांचे लक्ष्य गाठण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 2008 मध्ये मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध 205 धावांचे लक्ष्य त्याने गाठले होते.

सहाव्या स्थानावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचली दक्षिण आफ्रिका : 

दक्षिण आफ्रिकेच्या टीमला या विजयानंतर 12 पॉईंट्सचा फायदा झाला असून WTC पॉईंट टेबलमध्ये त्यांचे 40 पॉईंट्स झाले असून त्यांच्या विजयाची टक्केवारी ही 47.62 % इतकी झाली आहे. दक्षिण आफ्रिका बांगलादेश विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी 38.89 विजयाच्या टक्केवारी सह सहाव्या क्रमांकावर होती. पण बांगलादेशवर मिळवलेल्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड आणि इंग्लंडला WTC पॉईंट टेबलमध्ये मागे सोडले आहे. 

भारत WTC पॉईंट टेबलमध्ये पहिल्या नंबरवर : 

भारतीय टीम WTC पॉईंट टेबलमध्ये पहिल्या नंबरवर असून त्यांची विजयाची टक्केवारी ही 68.06 असून त्याच्याकडे 98 पॉईंट्स आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया तर तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंका आहे. भारताला WTC फायनलमध्ये स्थान मिळवायचे असल्यास त्यांना उर्वरित ८ पैकी ४ सामने जिंकावे लागतील. या चारही संघांच्या पॉईंट्समध्ये चांगले अंतर असले तरी प्रत्येक सामन्यानंतर हे समीकरण बदलत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सामना आजपासून पुण्यात सुरु असून हा सामना जिंकणं भारतासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे. जर हा सामना जिंकण्यात भारत अपयशी ठरला तर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यासाठी WTC फायनलमध्ये पोहोचण्याचे मार्ग खुले होतील.