Virat Kohli World Record : भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी (India vs Bangladesh Test Series) सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत रंगणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरला कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) कामगिरीवर क्रिकेट चहत्यांच्या नजरा असणार आहेत. टी20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता केवळ कसोटी आणि एकदिवसीय सामन्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीला एक मोठा विक्रम खुणावतोय.
विराट कोहली विक्रम रचणार?
विराट कोहलीची नेहमीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबरोबर (Sachin Tendulkar) तुलना केली जाते. कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 80 शतकं जमा आहेत. तर सचिन तेंडुकरने 100 शतकांचा विक्रम रचलाय. सर्वाधिक शतकांच्या यादीत सचिन तेंडुलकरनंतर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता विराटकडे सचिन तेंडुलकरचा एक मोठी विक्रम मोडण्याची संधी आहे.
सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणार?
सचिनचा शंभर शतकांचा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला आणखी काही कालावधी लागणार आहे. पण सचिनचा एक विक्रम विराटच्या टप्प्यात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा करण्यासाठी विराट कोहलीला केवळ 58 धावांची गरज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान 27,000 धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 623 डावात हा विक्रम केलाय. सचिन 27 हजार आंतरराष्ट्रीय धावा करण्यासाठी 226 कसोटी, 396 एकदिवसीय आणि 1 टी20 सामना खेळला. तर विराट कोहलीने आतापर्यंत 591 डावात 26942 धावा केल्या आहेत.
कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 58 धावा केल्यास 600 हून कमी डावात 27000 धावा करणारा पहिला फलंदाज बनणार आहे. सचिन तेंडुलकरशिवाय ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉण्टींग आणि श्रीलंकेच्या कुमार संगकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27000 धावा केल्या आहेत.
बांगलादेशविरुद्ध विराटची कामगिरी
बांगलादेशविरुद्ध विराट कोहलीची कामगिरी दमदार आहे. बागंलादेशविरुद्धच्या सहा कसोटी सामन्यात 437 धावा केल्या आहेत. यात त्याने 2 शतकं केली आहे. बांगलादेशविरुद्ध सर्वाधिक धावा चेतेश्वर पुजारा, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. पुजाराने 5 सामन्यात 468, द्रविडने 7 सामन्यात 560 तर सचिन तेंडुलकरने 7 सामन्यात 820 धावा केल्या आहेत.