मुंबई : आयपीएलची सुरुवात दणक्यात झाली आहे. चेन्नई, बंगळुरू आणि मुंबई संघाला मोठा झटका लागला आहे. मुंबई विरुद्ध दिल्ली संघाने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर रिषभ पंतच्या दिल्ली संघाला मोठा धक्का बसला आहे. हा संघ अडचणीत सापडला आहे. आधीच काही खेळाडूंची कमतरता आणि आता मॅच विनर खेळाडू संघातून बाहेर जाण्याची शक्यता आहे.
दिल्ली संघ नुकताच मुंबई विरुद्ध आपला सामना खेळला आहे. यामध्ये जरी विजय मिळाला असला तरी संघासमोर मोठं टेन्शन आहे. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आणि दिल्लीचा मॅच विनर संघातून बाहेर जाण्याची शक्यता आहे.
मिचेल मार्शला पहिल्या सामन्यात दुखापत झाली आहे. त्याची दुखापत पाहता तो पाकिस्तान विरुद्ध वन डे सामना ऑस्ट्रेलियाकडून खेळू शकेल याची शक्यता कमीच आहे. ही दुखापत गंभीर असेल तर त्यातून बरं होण्यासाठी 3 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती एरॉन फिंचने दिली आहे.
मार्श दिल्लीसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. ऑक्शनमध्ये त्याला 6.50 कोटी रुपये देऊन संघात घेतलं होतं. मार्श ऑलराऊंडर असल्याने त्याचा फायदा संघाला होतो. त्याने आयपीएलमध्ये 21 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 225 धावा केल्या तर 20 विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडूनही मार्श टी 20 चे 36 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 885 धावा केल्या तर 15 विकेट्स घेतल्या आहेत.
मार्शची संघातील उणीव दिल्लीसाठी धोक्याची आणि भारी पडू शकते. आधीच दिल्ली संघात सुरुवातीच्या सामन्यात 5 खेळाडू खेळणार नसल्याने मोठा खड्डा पडला आहे. त्यामध्ये मार्शही बाहेर होणं म्हणजे टेन्शन वाढणारच.
दिल्लीमधून डेव्हिड वॉर्नर, एनरिख नॉर्खिया, मुस्तफिजुर रहमान आणि लुंगी एनगिडी पहिले काही सामने खेळणार नाहीत. नॉर्खिया दुखापतीमुळे सध्या खेळू शकत नाही. त्यामुळे आता दिल्लीसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.
दिल्ली कॅपिटल्स टीम
रिषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्खिया, शार्दुल ठाकूर, मुस्तफिजूर रहमान, कुलदीप यादव, अश्विन हेबर, डेव्हिड वॉर्नर, कमलेश नागरकोटी, सरफराज खान, मिचेल मार्श, केएस भरत, मनदीप सिंह, खलील अहमद, चेतन सकारिया, ललित यादव, रिपल पटेल, यश धुल, रोवमैन पॉवेल, प्रवीण दुबे,लुंगी नगिडी, टिम सीफर्ट, विकी ओस्तवाल.